पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या कादंबरीत प्रयत्नसुद्धा केला नाही, ही फारच मोठी उणीव वाटते. संसारात राहूनही आत्मप्राप्ती होऊ शकते असा अनुभव भय्यासाहेबांना कसा आला, या दोन मूल्यांत संघर्ष मुळीच नाही, याचा प्रत्यय त्यांना केव्हा कोणत्या प्रकारे आला, याचे चित्रण त्यांनी केले असते तर प्रियब्रह्मस्वामींचा निर्णय ललितसाहित्यात साकार झाला असता. आहे या स्थितीत तो फक्त शाब्दिकच राहतो. त्याला साहित्याचे रूप येत नाही. आनंदरावांच्या बाबतीत तेच झाले आहे. भूसंशोधनाच्या कार्यासाठी ते जग प्रवासाला निघाले आणि उत्तरेने त्यांना पायबंद न घालता साथच केली, अनेक हाल अपेष्टा, यातना त्यांच्याबरोबर आनंदाने सोसल्या अशा चित्रणामुळे, स्त्री ही पुरुषाची सहचरी आहे, या विचाराला मूर्त रूप आले असते. रागिणी या कादंबरीत तसे झालेले नाही. त्या दृष्टीने पाहता 'इन्दुकाळे व सरला भोळे' या कादंबरीतील विनायकराव व सरला यांच्या संसाराचे चित्र जास्त प्रत्ययकारी व मनोज्ञ झाले आहे.
 ४ भ्रमरी विनायकरावांनी एम्. ए. झाल्यावर नोकरी न करता महात्माजींच्या आश्रमात जाऊन देशसेवेला वाहून घ्यावयाचे ठरविले होते. त्याचवेळी त्याच्या लग्नाचे घाटत होते. ते ज्या कॉलेजात फेलो होते त्याच कॉलेजातील सरला काळे या मुलीवर त्यांचे प्रेम होते. यावेळी देशसेवा की संसार असे काहीसे द्वंद्व त्यांच्याही मनात होते. पण त्याचे स्वरूप भय्यासाहेबांच्या मनातील द्वंद्वाइतके तीव्र नव्हते. कारण स्त्रीला पुरुषाइतकाच ध्येयवाद समजतो, त्यापायी होणाऱ्या हालअपेष्टा सोसण्यास तिचीही पुरुषाप्रमाणेच तयारी असते, याविषयी त्यांना शंका नव्हती. तरी याविषयी खात्री करून घ्यावी म्हणून, सरलाने त्यांच्या मागणीस संमती दिली, तेव्हा तिला मुद्दाम पत्र पाठवून त्यांनी मी एम्. ए. झाल्यावर देशकार्याला वाहून घेणार आहे, पुढे आपत्ती येतील याची पूर्ण जाणीव मनात बाळगूनच होय म्हटले आहेस ना ?' असे विचारले, सरलेला या विचारण्याचा सुद्धा राग आला. 'माझ्याबद्दल एवढी खात्री नव्हती तर मागणी तरी कशी घातली ?' असे तिने उलट पत्र लिहून विचारले. आणि त्यांना आश्वासन दिले की, 'मी आपल्याला मनाने वरिले ते आपल्या थोर विचारांना, उज्वल देशभक्तीला व पवित्र आचरणाला भाळून व त्यावर भ्रमरीप्रमाणे लुब्ध होऊन वरिले. तेव्हा आपल्या उच्च आकांक्षांच्या आणि देशभक्तीच्या आड मी कशी येईन ? ज्या गुणांनी देवाला देवत्व आले, ते गुण त्या देवाला मी सोडण्यास सांगेन आणि दगडाच्या मूर्तीची पूजा करीन, असे वाटले तरी कसे ?'
 पुढे लग्न झाल्यावर आधीच्या विचारांप्रमाणे विनायकराव साबरमतीला गांधीच्या सत्याग्रहाश्रमात गेले. त्यावेळी त्यांचे श्वशुर त्यांना विलायतेस पाठविण्यास व जावई आणि मुलगी या दोघांचा ही खर्च करण्यास तयार होते. कॉलेजात त्यांना प्राध्यापकाची जागाही मिळाली असती. पण ते सर्व सोडून ते साबरमतीला गेले. त्यानंतर सरला आपल्याला विरोध करील असे त्यांना कधीच वाटले नाही. पण आपल्यामुळे तिला

१०४
साहित्यातील जीवनभाष्य