पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंमत शून्य. पण ते तसे प्रतिबिंब नाही. जीवनातील घटना, प्रसंग हे असंगत, अबद्ध, सूत्रहीन असे असतात. त्यांतील घटना विशिष्ट हेतूने निवडून, असंबद्ध प्रसंग टाकून देऊन, निवडलेल्या घटनांची सुसंबद्ध आकृती निर्माण करणे, हे काव्यांचे कार्य होय. आणि गॅरॉडच्या मते, व्यक्ती, घटना, प्रसंग यांतील परस्पर संबंध उलगडून दाखविणे याचेच नाव जीवनभाष्य. याच संदर्भात गॅरॉड पुढे म्हणतो की, कवी हा जगाच्या मूलकारणांचा द्रष्टा होय. विश्व हे स्वतःचे ज्ञान नसल्यामुळे बावरलेले, गोंधळलेले असते. निसर्ग या संसाराचा अर्थ सांगत नाही. मानवाला तो जाणण्याची उत्कट इच्छा असते. तेव्हा त्यावर भाष्य करून तो अर्थ विशद करून सांगणे हे कार्य कवी करतो.' (पृ. ८-१०) ऑरिस्टॉटलाच्या काव्यातील एकतेचा, युनिटीचा, अर्थही गॅरॉडने जीवनभाष्य असाच केला आहे. 'काव्यात पूर्णाचे, सामग्र्याचे, साकल्याचे दर्शन घडवावयाचे असते. पूर्णाचा एक भाग, अवयवीचा एक अवयव, हा काव्यात वर्णिला असला तरी त्याचा पूर्णाशी संबंध दाखविणे अपरिहार्य असते. निसर्गात असे संबंध नसतात. काव्य हे यामुळेच निसर्गाहून भिन्न आहे. ते अवयव व अवयवी, अंश व पूर्ण यांचे संबंध स्पष्ट करते. आता हे संबंध कसे जुळविलेले असतात, कोणत्या धाग्याने जोडलेले असतात, असा प्रश्न येतो. कवीची विचारसरणी, त्याचा दृष्टिकोन हा तो धागा होय. लोकांना एकतेची अपेक्षा असते याचा अर्थ असा की त्यांना अर्थ कळण्याची अपेक्षा असते. आणि काव्याचे अंतिम उद्दिष्ट हेच असते. संसार हा काव्याचा विषय नव्हे; संसाराचा अर्थ हा, तत्त्वज्ञानाप्रमाणेच, काव्याचा विषय असतो. नाटकामध्ये व्यक्ती आणि त्यांच्या कृती व विकारभावना हा विषय नसून त्यांचा अर्थ, त्यांची संगती हा विषय असतो. हे जग, हा प्रपंच, हा संसार, त्यातील मानव, त्यातील निसर्ग हे सर्व जसे असते तसेच कवीने आपल्या पुढे उभे केले तर त्यात कोणालाच रस वाटणार नाही. त्याने त्याची अशी रचना केली पाहिजे की, ते सर्व सार्थ व्हावे. या विश्वाच्या पसाऱ्यात अमकी वस्तू, अमकी व्यक्ती, तिची अमकी भावना कोठे कशी बसते ते दाखविले तरच काव्य तयार होते. एरवी, ती मूळ वस्तू झाली; विश्वाची मूळ प्रकृती झाली. ते काव्य नव्हे.' (पृ. १७-१९,२७)
 साहित्याची व्याख्या मॅथ्यू अर्नोल्ड हा 'साहित्य म्हणजे जीवनाचे भाष्य' अशी व्याख्या करतो, हे प्रारंभी सांगितलेच आहे. या साहित्यातील जीवनभाष्याचे त्याला इतके महत्व वाटते की, यापुढे हळू हळू विज्ञान व धर्म यांची जागा काव्य घेईल, असे तो म्हणतो. (एसेज इन क्रिटिसिझम, सेकंड सेरीज, आवृत्ती १९१३, पृ. ३) जीवनभाष्य ही काव्याच्या अभिजाततेची तो कसोटी मानतो. आणि त्या दृष्टीने चाँसर व बर्नस हे मोठ्या दर्जाचे कवी असले तरी अभिजात या पदवीला येत नाहीत, असे त्याला वाटते. वर सांगितलेच आहे की सामान्यतः कवीचा जीवनविषयक दृष्टिकोन काव्यात व्यक्त होत असतो. आणि त्यात कळत नकळत जीवनभाष्य येतेच. पण केवळ असे भाष्य आहे यामुळे काव्य अभिजात होत नाही.

संस्कृतिदर्शन