पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा माणसाशी स्नेह ठेवायची मला इच्छा नाही, असे त्यांना साफ सांगितले. पण याचा कशाचाच उपयोग झाला नाही व भय्यासाहेब संसार सोडून निघून गेले.
 पुढे त्यांनी अनेक वर्षे भ्रमंतीत घालविली. अनेक साधूसंतांच्या सहवासात ते राहिले पण विरागी साधूपेक्षा ढोंगी, आपमतलबी साधूच फार, असा त्यांना अनुभव आला. शेवटी हिमालयात त्यांना प्रियब्रह्म नावाचे स्वामी भेटले. स्वामी पाश्चात्त्य विद्या विभूषित होते. त्यांना योगसिद्धीही प्राप्त झाली होती. त्यांनी 'कर्तव्यकर्म सोडून ब्रहाविद्येच्या मागे लागणे योग्य नव्हे' असा त्यांना उपदेश केला. स्वजनांना सुख देणे, देशाची सेवा करणे, लोकांत धर्मश्रद्धा जागृत करणे, प्रेमबुद्धीचा परिपोष करणे ही कर्तव्ये डावलून आत्मप्राप्ती होत नसते, असे त्यांनी सांगितले व तू पत्नी समवेत गृहस्थाश्रमात रहा आणि योग्यकाळी तुम्ही दोघेही वानप्रस्थाश्रम स्विकारा, अशी आज्ञा दिली. आणि अशा रीतीने आत्मप्राप्ती की संसार हे भय्यासाहेबांच्या मनातले द्वंद्व संपून ते परत गृहस्थाश्रमी झाले. स्त्री ही धर्मजिज्ञासेच्या आड येत नाही असा त्या द्वंद्वाचा निर्णय लागला.
 भय्यासाहेबांचे मित्र आनंदराव यांच्या मनात ध्येयवाद की संसार असेच द्वंद्व होते. पण ते फारसे महत्त्वाचे नव्हते. त्यांच्या जीवनाचा तो महत्त्वाचा घटक नव्हता. तेहि ग्रँट मेडिकल कॉलेजात वैद्यकीचा अभ्यास करीत होते. पण तेथे असतानाच मंगोपार्क, स्वेन हेडिन यांच्या सारखे भूसंशोधनाचे कार्य आपण करावे, असे त्यांना वाटू लागले. ते म्हणत, 'आपल्या लोकांनी असल्या शोधांचे काम हाती घेऊन, हिंदी लोकांमध्ये जिज्ञासा व धाडस आहे, हे जगाच्या निदर्शनाला आणून दिले पाहिजे.' मग पुढे आपण आपले आयुष्य या कामासाठी खर्ची घालावे, असे त्यांना वाटू लागले. आणि यासाठी विवाह, संसार हे वर्ज्य मानले पाहिजे असे त्यांच्या मनात येऊ लागले. पण याच वेळी त्यांच्या मनात उत्तरेविषयी प्रेम निर्माण झाले होते आणि यामुळे देशसेवा की प्रेम हा संघर्ष त्यांच्या मनात निर्माण झाला होता. एकद त्यांनी त्या प्रेमाचा त्याग करण्याचा अगदी निर्धार केला. ते मनात म्हणाले, 'उत्तरे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण तुझं माझ्यावर प्रेम नसतं तर बरं झालं असतं. मग माझं प्रेम मला आवरता येऊन स्वदेशाकडे अधिक उत्साहाने लक्ष द्यायला सापडला असतं. पण ते काही नाही. मी हा त्याग करणारच. बस्स. ठरलं ! उत्तरे, स्वदेश सेवेपुढे, तुझ्या प्रेमाचा मी होम करणार. मी उद्या तुझा व तुझ्या प्रेमाचा त्याग करून जाणार.' पण त्यांचा हा निर्धार फार काळ टिकला नाही. उत्तरेने त्यांन आपल्या प्रेमाने जिंकले व त्यांनीही तिला तसे जिंकू दिले.
 मोठी उणीव भय्यासाहेब व आनंदराव यांच्या मनातील ध्येय व संसार या मूल्यांचा संघर्ष वामनरावांनी दाखविला आहे. इतर कोणत्याच कादंबऱ्यात हे उच्च पातळीवरचे द्वंद्व आढळत नसल्यामुळे त्याला महत्व आहे हे खरे. पण स्त्री ही ध्येयाच्या आड येत नाही' हा जो त्या द्वंद्वाचा निर्णय तो मूर्त करण्याचा त्यांनी

मूल्य संघर्ष
१०३