पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विषय आहे. त्यांत निर्माण होणारे प्रधान व गौण सर्व समरप्रसंग या मूल्यसंघर्षातूनच निर्माण झालेले आहेत.
 'रागिणी' कादंबरीतील भय्यासाहेब व आनंदराव आणि 'इन्दु काळे व सरला भोळे' या कादंबरीतील विनायकराव भोळे व नारायणराव पाठक या तरुणांच्या जीवनात मूल्यांचे द्वंद्व निर्माण झालेले आपल्याला दिसते, गीतारहस्यात लो. टिळकांनी चर्चिलेली कर्माकर्म जिज्ञासा ती हीच होय. या चारही ध्येयवादी तरुणांच्या चित्तात निर्माण झालेल्या या द्वंद्वाचे स्वरूप बरेचसे सारखे आहे. या चौघांनाही काही महत्कार्य करावयाचे आहे. आणि त्या कार्यसिद्धीच्या आड विवाह, स्त्री, संसार है येईल अशी त्यांना शंका येते. त्यामुळे विवाह करू नये, संसार मांडू नये किंवा मांडलेल्या संसारातून उठून जावे असे त्यांच्या मनांत येते. संघर्षाचे स्वरूप असे सगळीकडे सारखे असले, तरी समरप्रसंगाचे स्वरूप बरेचसे भिन्न असल्यामुळे व प्रत्येकाची स्वतःची त्याविषयीची प्रतिक्रिया व त्यांच्या सहचरांची प्रतिक्रिया वेग. वेगळी असल्यामुळे त्यांच्या कथांना साचेबंद रूप आलेले नाही.
 भय्यासाहेब व आनंदराव हे दोघेही तरुण मित्र मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. वैद्यकीचा अभ्यास चालू असतानाच थिऑसफीकडे भय्यासाहेबांचे मन आकृष्ट झाले व कॉलेजच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून ते अध्यात्मविद्येचा अभ्यास करू लागले. मोक्ष हे प्रत्येक मानवाचे अंतिमसाध्य असून त्यासाठी घरादाराचा त्याग करून अरण्यात निघून जाणे अवश्य आहे, असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. ते मूळचे विजयगावचे राहणारे. त्यांचे वडील रावसाहेब गुपचुपे हे एक जहागीरदार असून ते चांगले बडे श्रीमंत आणि तितकेच कंजुष होते. त्याच गावात राहणारे भाऊसाहेब यांची कन्या रागिणी ही याच सुमारास भय्यासाहेबांना सांगून आली होती. रागिणी ही अतिशय सुरेख असून मोठी बुद्धिमान व विनयशील होती. भय्यासाहेबांच्या मनात डॉक्टरीचा अभ्यास आणि थिऑसफी यांचे द्वंद्व आधी चालूच होते. आता रागिणी समोर आल्यामुळे धर्म जिज्ञासा आणि रागिणी हे दुसरे द्वंद्व सुरु झाले. स्वतःच्या मनाची ते समजूत घालीत की, रागिणी ही आत्म प्राप्तीच्या आड येईल ही कल्पनाच चुकीची आहे. धर्माच्या आड संसार येतो हे सयुक्तिक नाही.' त्यांचा हा प्रयत्न काही काळ यशस्वी झाल्यामुळे त्यांनी विवाहाला संमती दिली व त्याप्रमाणे रागिणी त्यांची पत्नी झाली. पण विवाहानंतर त्यांचे मन पुन्हा जास्तच जोराने थिऑसफीकडे, ब्रह्मविद्येकडे वळून ते हिमालयात निघून जाण्याची भाषा बोलू लागले. रागिणीने परोपरीने त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. 'संसारात राहून कामक्रोधादि मनोविकार जिंकील त्यानेच खरे षड्रिपू जिंकले. अरण्यात जाऊन जिवाचे हाल करून घेतल्यानेच आत्म्याची उन्नती होते असे थोडेच आहे ?' असे ती वरचेवर त्यांना सांगे, त्यांचे मित्र आनंदराव यांनी तर रागिणीसारख्या पत्नीचा त्याग करणे हा नीचपणा आहे, असे म्हणून त्यांची निर्भत्सना केली आणि

१०२
साहित्यातील जीवनभाष्य