पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवनाचा खोल अभ्यास करावा लागतो. मूल्यांमुळे मानवी मनात निर्माण होणारे हे द्वंद्व हा मानवी जीवनातला अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असल्यामुळे जीवन भाष्यात त्याला अर्थातच महत्त्वाचे स्थान प्राप्त होणे अपरिहार्य आहे. जगातल्या महाकवींनी तसे ते दिलेलेही आहे. जगातल्या थोर काव्यग्रंथांत हा मूल्यसंघर्ष महाकवींनी कसा वर्णिला आहे व त्यावर कसे भाष्य केले आहे ते आता पहावयाचे आहे.
 १ सिंह आणि दिलीप  महाकवी कालिदास याने रघुवंश या महाकाव्यात राजा दिलीप व सिंह यांच्या संभाषणातून 'ध्येयवाद व उपयुक्ततावाद' या मूल्यांच्या द्वंद्वाचे उत्तम चित्रण केले आहे. पुत्रप्राप्तीसाठी वसिष्ठांच्या आज्ञेवरून दिलीप राजा नंदिनी या कामधेनूची सेवा करीत होता. एक दिवस तो तिला रानात चरावयास घेऊन गेला असताना त्याची परीक्षा पाहण्यासाठी नंदिनीने आपल्या मायेने एक सिंह निर्माण केला. त्या सिंहाने एकदम नंदिनीवर झडप घातली. तेव्हा तिच्या रक्षणासाठी राजा धनुष्याला बाण जोडू लागला. पण एकाएकी त्याचा हात रुद्ध होऊन त्याला हालचालच करता येईना. हे पाहून राजा अत्यंत संतप्त झाला व आता आपल्या कपाळी फार मोठे अपयश येणार हे ध्यानी येऊन, तो मनातल्या मनात अगदी जळू लागला. पण इतक्यास तो सिंह मनुष्यवाणीने त्याच्याशी बोलू लागला. तो म्हणाला, 'राजा, मनाला वाईट वाटू देऊ नकोस. भगवान शंकरांनी या समोर दिसणाऱ्या देवदारु वृक्षाच्या रक्षणासाठी मला येथे ठेवले आहे. आणि जवळपास येणाऱ्या पशूंवर मी आपली उपजीविका करावी अशी मला अनुज्ञा दिलेली आहे. त्याप्रमाणे या गाईला मी धरली आहे. तेव्हा तू उगाच धडपड करू नको.' परमेश्वरी सत्तेपुढे तुझे काही चालणार नाही. आणि गाईचे रक्षण करणे तुझ्या शक्तीबाहेरचे आहे. तेव्हा ते करता आले नाही म्हणून क्षात्रधर्माला कलंक लागला, असेही तुला वाटण्याचे कारण नाही. सिंहाचा हा युक्तिवाद राजाला मुळीच पटला नाही. तो म्हणाला, 'त्रैलोक्यनाथ शंकरांची आज्ञा मला मान्य आहे. पण माझे गुरूदेव वसिष्ट यांच्या या गोरूप धनाचे रक्षण करणे हेही माझे कर्तव्य आहे. तेव्हा असे कर मी माझा देह तुला अर्पण करतो. तो घेऊन नंदिनीला सोड, राजाचा हा विचार ऐकुन सिंहाला हसू आले. तो म्हणाला 'राजा, तू अगदी वेडा आहेस. अरे जगाचे एकछत्री राज्य, स्वतःचा कांतिमान देह आणि तारुण्य हे सर्व महाधन एका क्षुद्र गाईसाठी टाकायला तयार होतोस ? तुला म्हणावे तरी काय ? भूतदयेमुळे तुला हा त्याग करावा असे वाटत असेल तरी ते युक्त नाही. स्वतःचा प्राण देऊन फार तर तू ही एक गाय वाचविशील. उलट जगलास तर आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे रक्षण करशील. तो लाभ मोठा आहे. गुरूदेव वसिष्ठ रागावतील अशी तुला भीती वाटत असेल तर त्यावरही उपाय सांगतो. तुझ्या राज्यातून या एका गाईच्या बदल्यात त्यांना लक्षावधी गाई देऊन त्यांचा क्रोधाग्नी शमविता येईल. तेव्हा इंद्रासारखे तुझे जे राज्य त्यापासून मिळणाऱ्या अनंत सुखांचा भोक्ता असा हा तुझा देह

मूल्य संघर्ष
९९