पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





५ मूल्य संघर्ष



 मूल्य - महत्त्व मानवी जीवनात मूल्यांना फार महत्त्व असते. पूर्वीच्या काळी ते होते, आजही आहे व पुढेही ते तसेच राहील. मूल्यावाचून मानवी जीवन संभवतच नाही. जीव सर्वांना प्रिय असतो, पण स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणारे हजारो स्त्रीपुरुष इतिहासात होऊन गेलेले आपण पाहतो. स्वातंत्र्य या मूल्यापुढे प्राण हे मूल्य त्यांना तुच्छ वाटते. धर्म, सत्य, ही मूल्ये अशीच आहेत. पूर्वी 'तत्त्व' हा शब्द वापरीत. आता 'व्हॅल्यूज' या इंग्रजी शब्दावरून 'मूल्य' हा शब्द मराठीत रूढ झाला आहे. पण त्यातील भावार्थ जुनाच आहे. हा भावार्थ अत्यंत उच्च श्रेणीच्या समाजात जसा आढळतो तसाच अगदी रानटी समाजातही दिसून येतो. रानटी माणसाच्या मनातही देव कल्पना असतेच. आणि काही सुखे त्यासाठी टाकली पाहिजेत हा विचार त्या समाजातही रूढ झालेला दिसतो. समाजरक्षणासाठी, त्याच्या संवर्धनासाठी वेळोवेळी समाजधुरीणांनी अनेकविध मूल्ये स्थापन केलेली असतात आणि समान त्यांना प्रमाण मानून त्यांची जपणूक करीत असतो. अहिंसा, पातिव्रत्य, राष्ट्रप्रेम, समता, भूतदया, दिलेला शब्द, केलेली प्रतिज्ञा ही सर्व अशीच तत्त्वे किंवा मूल्ये आहेत. या मूल्यांवरील भक्ती इतकी सर्वव्यापी आहे की, मानवी इतिहास म्हणजे मूल्यांचा इतिहास म्हटले तरी चालेल.
 मूल्य संघर्ष अनेक वेळा दोन भिन्न मूल्यांचा व्यक्तीच्या जीवनात संघर्ष होऊन कोणत्या मूल्याचा आदर करावा हे तिला कळेनासे होते. लो. टिळकांनी गीता रहस्यात कर्म जिज्ञासा या प्रकरणात सत्य, अहिंसा, सर्वभूतहित इ. सर्वमान्य वाटत असलेल्या तत्त्वांनाही धर्मशास्त्रज्ञांनीच कसे अपवाद सांगितले आहेत याचे तपशिलाने वर्णन केले आहे. स्वजनहत्या की राज्यलाभ हा अर्जुनापुढे आलेला प्रश्न मूल्यसंघर्षातूनच उद्भवला होता. असा संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात केव्हा ना केव्हा तरी निर्माण होतोच. आणि ललित लेखकाला त्याचे दर्शन घडविण्यासाठी

९८
साहित्यातील जीवनभाष्य