पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचा असा बळी देऊ नकोस.'
 सिंहाचा हा उपयुक्ततावाद मोठ्या चतुराईने त्याने मांडला होता. पण राजाच्या मनातील ध्येयवाद हे मूल्य अणुमात्र विचलित झाले नाही. तो सिंहाला म्हणाला, 'हे मृगेन्द्रा, अरे क्षतापासून, संकटांपासून रक्षण करतो तो क्षत्रीय, आम्हा क्षत्रियांची जगात अशी कीर्ती आहे. क्षात्रधर्माचि ते यश गेल्यानंतर, मला राज्य किंवा प्राण मिळून तरी करावयाचे आहे काय? तेव्हा तू माझा हा देहच नंदिनी ऐवजी घे. माझ्या या जड भौतिक देहावर दया न दाखविता माझ्या यशरूप देहावर दया दाखवा. माझ्या सारख्याला क्षात्रधर्माच्या पालनापुढे या मर्त्य देहाची मुळीच किंमत वाटत नाही.' असे म्हणून राजाने आपला देह सिंहापुढे झोकून दिला त्याच्या या ध्येयनिष्ठेमुळे नंदिनी प्रसन्न झाली क्षणार्धात सिंह लुप्त झाला. व 'वत्सा ऊठ' अशी प्रेमळपणे तिने राजाला हाक मारली. राजा धरणीवर पडला असताना देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली, असे सांगून ध्येयवाद व उपयुक्ततावाद यातील श्रेष्ठ मूल्य कोणते या विषयीचा स्वःतचा अभिप्रायही कालिदासाने प्रगट केला आहे. कवीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्या काव्यात सहजासहजी प्रगट होतो असे म्हणतात, त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
 २ शिव प्राप्तीचा मार्ग ?  कुमारसंभवात कालिदासाने दुसऱ्या दोन मूल्यांचे असेच द्वंद्व वर्णिले आहे. शिवप्राप्ती, ध्येयप्राप्ती, कोणत्या शक्तीने सुलभ होईल ? तपःसामर्थ्याने का धनैश्वर्य, स्त्रीरूपसौंदर्य या सामर्थ्याने ? तारकासुराने देवांवर आक्रमण करून त्यांना पराभूत केले होते. देवांचे सर्व सामर्थ्य, इंद्राचे वज्र, यमाचा दंड, वरुणाचा पारा, सर्व सर्व त्याच्यापुढे हतप्रभ झाले होते, निष्फळ ठरले होते. देव- सर्व अगदी हैराण होऊन गेले, दीन झाले. तेव्हा ब्रह्मदेवाचा त्यांनी धावा केला. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले, 'शिवापासून पार्वतीला जर पुत्र झाला तर तोच फक्त तारकासुराला जिंकू शकेल. सध्या शिव हिमालयात तपःश्चर्या करीत आहे. पार्वती तेथेच त्याची सेवा करण्यासाठी राहिली आहे. तेव्हा शिवाचे मन तिच्याकडे आकृष्ट करणे जर तुम्हाला शक्य झाले तर पहा. त्यांच्या पुत्रावाचून दुसऱ्या कोणालाही तुमचे संकट निवारणे शक्य होणार नाही.'
 आपल्या राजधानीला परत येताच इन्द्राने मदनाला बोलावणे पाठविले. आज्ञेप्रमाणे येऊन त्याने देवेश्वराला नमस्कार केला व काय आज्ञा आहे, म्हणून विचारले. तो म्हणाला, 'देवेन्द्रा तुमच्यावर काय संकट आले आहे, मला सांगा. क्षणार्धात मी त्याचे निवारण करतो. ऊग्र तपश्वर्या करून तुमचे पद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कोणी करीत आहे काय? त्याचे नाव मला सांगा. प्रमदांच्या कटाक्ष बाणांनी त्याला विधून मी तत्काळ त्याला तुमच्या पुढे लोळवितो. का असे नसून कोणी शृंगार लता नितंबिनी तुमच्या मनात भरली आहे. मग अडचण काय आहे ? ती पतिव्रता आहे, ती कशी वश होणार, अशी चिंता तुम्हाला वाटते आहे काय ? तिचे पातिव्रत्य हेच तुमच्या इच्छेच्या

१००
साहित्यातील जीवनभाष्य