पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ताई माहेरी भाऊकडे येऊन राहिली होती. तेव्हा आता ही आपली नात ख्रिस्ती होणार आणि साहेबाशी लग्न करणार असेच आजीच्या मनाने घेतले. आणि भाऊकडे येऊन तीनचार दिवस ताईला माझ्याकडे मी घेऊन जाणार म्हणून धरणे धरून बसली होती. अनेक स्त्रियांची अशीच समजूत होती. समाजाच्या या विचारसरणींचे, या भीतीचे, असल्या शंकाकुशंकांचे हरीभाऊंनी उत्तमदर्शन घडविले आहे. आणि ताई, सुंदरी यांचा सहवास घडून या सुधारक स्त्रियांच्या आचरणात वावगे असे काही नाही, असे ज्या थोड्या स्त्रियांना ध्यानात आले त्यांचे उद्गार देऊन हरिभाऊंनी आपला सुधारकांविषयीचा अभिप्राय व्यक्त केला आहे.
 'एवढी मोठी घोडी झाली, तिचं नाही लगीन, आणि तिला तुम्ही शिकवता ? मी तर ऐकलं आहे की, तिच्या बापाच्या मनातून तिला साहेबाला द्यायची आहे.' 'अग, अग मेले काय हे बोलतेस ? तुझ्या जिभेला काही हाड ? तिनं एक लगीन केलं नाही. एवढंच काय असेल ते पण ती म्हणजे एक पतिव्रता आहे बरं. काय तिचे एकेक गुण सांगू तुला ! अगदी सारं आयुष्य दुसऱ्यावर उपकार करण्यात, दुसऱ्याचं हित करण्यात घालवायचं, असा तिचा निश्चय आहे.'
 हरिभाऊंनी 'मी' कादंबरी १८९६ साली लिहिली. त्याआधी पन्नास पाऊणशे वर्षे अमेरिकेतील स्त्रीची स्थिती फारशी निराळी नव्हती. मतदानाचा हक्क तर तिला नव्हताच पण मनुष्यत्वाचाही हक्क तिला नव्हता. कायद्याने ती पुरुषाची दासी होती. तिची मुलावर सत्ता नव्हती, धनावर सत्ता नव्हती, ज्ञानावर नव्हती. मारझोड तिच्या कपाळी नित्याची होती. १८५४ च्या सुमारास सुसन अँथनी, अर्नस्टाइन रोज व एलिझा बेथ स्टॅटन यांनी स्त्रीविमोचनाची चळवळ सुरू केली त्यावेळी 'या बायका पठाणी आहेत, हाडळी आहेत, पाखंडी आहेत' असा त्यांच्यावर भडिमार झाला. त्या सभेत बोलू लागल्या तेव्हा एका संपादकांनी लिहिले की, 'अँथनीबाईचे भाषण चांगले झाले, पण माझी बायको किंवा मुलगी अशी सभेत उभी राहून भाषण करु लागली तर त्यापेक्षा ती मेलेली मला पुरवेल.' घरी सुद्धा स्त्रीचा आवाज बाहेर ऐकु येणे हे असभ्यपणाचे लक्षण मानले जाई. मग सभेची गोष्ट कशाला? सुंदरी व ताई या शाळेत जाऊ लागल्या, पुढे काही नवे विचार बोलू लागल्या त्यावेळी त्यांच्यावर येथे जो भडिमार झाला म्हणून हरिभाऊंनी वर्णिले आहे त्यापेक्षा किती तरी अधिक भडिमार ३०/३५ वर्षापूर्वी अमेरिकेत चळवळ्या स्त्रियांच्या समान हक्काचा अर्ज न्यूयॉर्क विधान सभेपुढे आला तेव्हा बर्नेट नावाचे सभासद संतापून म्हणाले, 'स्त्री' ही पुरुषाच्या बरोबरीची आहे हा विचार किती भयंकर आहे, पापमय आहे. लांछनास्पद आहे. याची तुम्हांला कल्पना आहे काय ? परमेश्वराने स्त्री पुरुषाची दासी म्हणून योजिली आहे. स्त्रिया असे वागू लागल्या तर स्त्रीला घरात कैदेत ठेवण्याशिवाय दुसरा उपाय नाही. एरवी पुरुषांना तोंड दाखवायला जागाच राहणार नाही. 'स्त्रियांना सम देखावे असे म्हणता. अन उद्या विधान सभेत भाषण करीत

९६
साहित्यातील जीवनभाष्य