पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समन्वय होऊन मग ते आविष्कृत झाले तरच तो आत्माविष्कार होतो. केवळ अनुभूती, केवळ मनातल्या भावभावना, विकार विचार हा कलेचा कच्चा माल होय. ती चित्र तयार होण्यापूर्वीची माती होय. ते चित्र नव्हे. ते केवळ ध्वनी होत, आलाप नव्हेत, संगीत नव्हे. कलाकाराच्या अंतरात्म्याच्या मुशीत हा कच्चा माल जाऊन संस्कारित होऊन, सुश्लिष्ट होऊन मग प्रगट झाला, त्याचे निर्गुण, निराकार रूप जाऊन तो सगुण साकार झाला म्हणजे तो कलाकाराचा आत्माविष्कार ठरतो. हा क्षणिक स्फूर्तीने घडत नाही. ते कालावधीचे काम आहे. प्रत्यक्ष सर्वसमर्थ परमेश्वराला सुद्धा निराकार, रुपहीन, अशा मूळ प्रकृतीतून विश्व निर्माण करण्यास सात दिवस लागले ! कलाकाराच्या मनात अनेक अनुभूती, अनेक संस्कार, साठवणाप्रमाणे भरलेले असतात. त्यांची संगती लावून त्यांचा अर्थ लावणे व तो प्रगट करणे हे त्याचे कार्य होय. विज्ञानही संसाराचा अर्थ लावीत असते. पण विज्ञान त्या अर्थाचे केवळ निवेदन करते. कला त्याचा आविष्कार करते.'
 आत्माविष्कार काव्याचा विषय आणि आशय यांत जॉन ट्यूई भेद करतो. 'स्कायलार्क', 'नाइटिंगेल' हे शेले, कीटस् यांच्या काव्याचे विषय आहेत. पण दोघांचे विषय तेच असले तरी त्यांवर त्यांनी रचलेल्या कवनांचे आशय अगदी भिन्न आहेत. त्या आशयांतून त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन, त्यांनी संसाराचा, जीवनाचा बसविलेला अर्थ व्यक्त होतो. किंबहुना या त्यांच्या मनांतील अर्थामुळेच तो तो विषय पाहाताच त्यांच्या मनात आशय निश्चित झाला आणि मग त्यांनी आपली कलाकृती निर्माण केली. तो अर्थ त्यांनी मागून बसविला, असे नाही. केवळ विषय पाहून नाइटिंगेल व स्कायलार्क यांना पाहून कवी काव्य लिहीत नाही. तसे केल्यास त्याची कलाकृती कृत्रिम होईल. कलाकाराच्या अंतरात अनंत भाववृत्ती, अनेक अनुभूती यांचे रसायन नेहमीच असते. सामान्य माणसापेक्षा हे कवीचे, कलाकाराच्या मनातले, रसायन अधिक संपन्न असते. हे रसायन म्हणजेच त्याचे भांडवल होय. समोर विषय दिसताच हे रसायन हेलावते आणि मग आपली जीवनमूल्ये, आपल्या अनुभूतीचे सार कवी त्या विषयाशी एकजीव करून त्या विषयाला एक नवाच अर्थ व महत्त्व प्राप्त करून देतो. आणि अशा रीतीने प्रत्येक कलाकृती अत्यंत अर्थगर्भ झालेली आपल्याला दिसते. जॉन ड्यूईच्या या विवेचनावरून आत्माविष्कार म्हणजे कलाकाराने, कवीने आपल्या दृष्टीकोनातून केलेले जीवनभाष्य होय, हे स्पष्ट होईल.
 एकसूत्रता कशामुळे? एच्.डब्ल्यू. गॅरॉड हा ऑक्सफर्ड विद्यापीठातील काव्य या विषयाचा प्राध्यापक. 'दि प्रोफेशन ऑफ पोएट्री' नामक आपल्या ग्रंथात त्याने ॲरिस्टॉटलच्या 'काव्य म्हणजे जीवनाची प्रतिकृती- प्रतिबिंध' या व्याख्येची चर्चा करून 'इमिटेशन' या त्यांच्या शब्दाची विवक्षा 'जीवनभाष्य' अशी आहे, असे प्रतिपादिले आहे. तो म्हणतो, 'साहित्य हे केवळ जीवनाचे प्रतिबिंब असेल तर त्याची

साहित्यातील जीवनभाष्य