पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________


प्रस्ताव ना विवेकाने ज्यांनीं सुघटित समाजा टिकविलें, महासिद्धांताचें हृदय रसिकत्वें उकलिलें, लसद्भक्तिज्ञानें तरतरविला धार्मिक तरु, तया ज्ञानेशांत विमल मतिनें वंदन करूं, ज्ञानदेव महाराजांचं महाराष्ट्रसंतमंडळांत अनेक बाजूंनी अत्यंत महत्त्व आहे. तत्त्वज्ञानी, प्रेमळ- ईश्वरभक्त, सामाजिक नेते, अलौकिक योगी, ब्रह्मचारी, धर्मसंरक्षक आणि प्रासादिक ग्रंथकार, अशा अनेक नात्यांनीं त्यांची निर्मळ कीर्ति आज साडेसहा शतकें अखंडपणें दिव्य घोषानें महाराष्ट्रांत दुमदुमत राहिली आहे. या साडेसहाशे वर्षांच्या दीर्घ अवधीत महाराष्ट्र देश अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय व बौद्धिक स्थित्यंतरांतून गेला आहे आणि सांप्रतही तो संक्रमणावस्थेतच आहे. तरी प्रत्येक स्थितीत आणि सद्यः कालीही नव्या जुन्या मतांच्या सर्व पक्षांत कोणत्या ना कोणत्या तरी कारणास्तव या महात्म्याविषयीं अपरंपार आदर व पूज्यभावच प्रकट झालेला आहे; आणि त्यांतल्या त्यांत 'ज्ञानदेवी' ग्रंथाचे कर्ते आणि पंढरपुरच्या वैष्णव संप्रदायाचे प्रवर्तक या नात्यांनी मननशील ज्ञानिजनांच्या, तसेंच भोळ्या भाविक धार्मिकांच्याही, जिव्हाळ्याशी ते एकजीव होऊन राहिले आहेत. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे गोदातीरावरील पैठणजवळील आपेगांवच्या गोविंदपंत कुळकण्यांचे चिरंजीव. अल्पवयांतच वेदाध्ययन व शास्त्राध्ययन करून विठ्ठलपंत मोठे ज्ञानसंपन्न व वैराग्यशील ईश्वरभक्त झाले. संसारांत त्यांचे मन रमेना. तीर्थक्षेत्रांच्या यात्रा कराव्या, भक्तमंडळीच्या सहवासाची जोड जोडावी, आणि ईश्वरसेवेंत आयुष्य सार्थकी लावावें, अशी त्यांच्या मनाला सारखी ओढ लागली होती. यामुळे कुमारावस्थेतच ते जे तीर्थाटनाकरितां घरांतून बाहेर झटकले, ते निरनिराळ्या क्षेत्रांचे दर्शन घेत घेत पुण्याजवळ आले. आळंदीस सिधोपंत कुळकर्णी नांवाचे एक वस्तु व भाविक सज्जन होते. सिद्धेश्वराच्या देवळांत उतरलेल्या या तरुण पांथस्थ ब्राह्मणाची ती ज्ञानसंपन्न मुद्रा, निर्मळ भावयुक्त वृत्ति, आणि कर्मनिष्ठ आचरण, ह्रीं पाहून सिधोपंतांनी आपली उपवर कन्या त्यांस देण्याचें मनांत योजलें, व त्याप्रमाणे त्यांनी विठ्ठलपंतांजवळ बोलणंही लावलें. विठ्ठलपंतांनी त्यांना एकदम निकाली जबाब दिला नाहीं; पण त्यांना लवकरच त्या मुलीचें पाणिग्रहण करण्याबद्दल स्वप्नदृष्टांत झाला, आणि हाच ईश्वरी निदेश समजून विठ्ठलपंतांनी सिधोपंतांच्या मुलीशी लग्न करून घरसंसार थाटला. विठ्ठलपंतांनीं दारपरिग्रह केला खरा, पण त्यांचे चित्त संसाराकडे लागेना. आपण निष्कारण या गुंत्यांत स्वतःला गुरफटून घेतलें, असें त्यांचे मन त्यांस खाऊं लागलें. त्यांची स्त्री रुक्मिणी ही मोठी पतिपरायण होती, पण पतीचे चित्त मुठीत ठेवणें हें तिला पारा मुठीत धरण्याइतकेंच अवघड झालें. विठ्ठलपंत अगदी उदासीनपणें ईश्वरभजनांत दंग असत, व त्यांना तीर्थयात्रांचा ध्यास सारखा लागलेला असे. लग्न झाल्यापासून विठ्ठलपंत आळंदीस बरेच दिवस राहिले. एकदा सासुरवाडच्या सर्व मंडळीसह ते पंढरपुरच्या यात्रेस गेले, आणि तो काळ मात्र त्यांना मोठ्या सुखानंदाचा झाला. यानंतर ते आपल्या पत्नीसह आपेगांवास आईबापांकडे गेले. पण सूनमुख पाहण्याचे सौख्य फार दिवस भोगण्याचे विठ्ठलपंतांच्या मातापितरांच्या नशीबी नव्हतें. ती लवकरच कैलासवासी १ 'ज्ञानेश्वर' असें जरी या संतशिरोमणीचे नांव सर्वतोमुखी आहे, तरी ते आपल्या ग्रंथांत सर्वत्र आपला उल्लेख ' शानदेव ' याच नांवाने करतात, म्हणून आम्ही हेच नांव प्रस्तावनेत सर्वत्र योजिलें आहे. २ या ग्रंथाचे मूळ नांव भगवद्गीतेवरील 'भावार्थदीपिका' टीका हें आहे, व सामान्यतः तो 'ज्ञानेश्वरी म्हणून लोकप्रसिद्ध आहे. ३ यालाच व्यवहारांत वारकरी पंथ ' म्हणतात.