पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ मजकडे सोपविली व मी ती यथामति यथाशक्ति पार पाडली आहे. पूर्वावृत्तींत क्वचित् स्थल, योग्य पाठभेदांच्या अभावी किंवा अनवधानामुळे कांहीं ओव्यांचा अर्थ बरोबर लागला नव्हता तो या आवृत्तींत लावला आहे व मुद्रितं शक्य तितक्या कसोशीनें तपासली आहेत. शिवाय आरंभीं गीतामाहात्म्य व गीताध्यान नवीन घालून पुढं मूळ गीता श्लोकाखालीं असलेल्या वामनी व मोरोपंती समश्लोकींच्या जोडीस मुक्तेश्वरी ओंवी दिली आहे. त्याचप्रमाणें अर्थाला पूर्वीच्यापेक्षां ठळक टाईप वापरला असून आरंभी श्रीज्ञानेश्वर महाराजांचें सुंदर दोन रंगी चित्र घातले आहे. बहिरंगांतील सुधारणा म्हणजे बांधणी सुंदर सोनेरी केली असून, ज्ञानेश्वरमहाराजांचं नावीन्यपूर्ण चित्र असलेले वेष्टन चढविलें आहे. आणि अंतरंगांत व बहिरंगांत इतकी सुधारणा करूनही किंमत पूर्वीचीच कायम ठेविली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्ञानदेवमहाराजांनी ज्या ठिकाणीं 'ज्ञानेश्वरी' ग्रंथ लिहिला त्या नेवासें गांवीं सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेला 'ज्ञानदेव- महोत्सव' होय. अशा प्रकारचा हा उत्सव महाराष्ट्रांत पहिल्यानेंच झाला आणि तोही ज्ञानेश्वरी - रचनास्थली झाला ही मोठ्या आनंदाची गोष्ट होय. या उत्सवांत अनेक प्रसिद्ध विद्वान् गृहस्थांनी भाग घेतला होता व एकंदर उत्सव मोठ्या थाटामाटांत झाला. उत्सवानिमित्त, अनेक अधिकारी लेखकांनीं लिहिलेला सुमारें १६०० पृष्ठांचा 'श्रीज्ञानेश्वर - दर्शन' या नांवाचा एक ग्रंथही प्रसिद्ध करण्यांत आला असून, त्याच्या योगानें श्रीज्ञानदेवविषयक वाङ्मयांत, व एकंदर मराठी वाङ्मयांतही, मोठ्या महत्त्वाची भर पडली आहे. अशा रीतीनें ज्ञानेश्वरमाउलीचा जयजयकार वाढत्या प्रमाणांत, आणि तोही पाश्चात्यविद्याविभूषितांकडून होऊं लागला आहे, हें भावी भाग्योदयाचें प्रसादचिन्हच होय असें मी समजतों. प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशक रा. ढवळे यांचा प्रस्तुत सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रसिद्ध करण्यांत मुख्य उद्देश हा आद्य व श्रेष्ठ ग्रंथ, त्याच्या अर्थासह, अत्यंत अल्प किमतींत देऊन त्याचा शक्य तेवढा प्रसार करावा एवढाच होता व तो चांगल्या रीतीनें सिद्धीस गेला आहे असें समजण्यास आतां हरकत नाहीं. या ग्रंथाच्या चार हजार प्रती गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्रभर पसरल्या आहेत, यावरून अशा प्रकारच्या स्वस्त किंमतींत मिळणाऱ्या सार्थ ज्ञानेश्वरीची महाराष्ट्रीयांस आवश्यकता होती है सिद्ध होऊन चुकलें आहे. फार मोठ्या आकाराच्या सुमारे ९०० पृष्ठांचा, जाड ग्लेज कागदावर ठळक ठशांनीं छापलेला व जाड पुडयाच्या सोनेरी बांधणीचा हा प्रचंड ग्रंथ अवघ्या तीन रुपयांत देण्यांत, ग्रंथप्रसारापलीकडे प्रकाशकाचा दुसरा कांहीं हेतु असणं शक्य आहे कीं काय, हे वाचकांनीच सांगावें. संतसेवक, जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर