पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "शर्मन् स्या॒म॒ तव॑ सं॒प्रथः॑ तमे" ह्या पदांची संहिता "श॑र्मन्त्स्याम॒ तव स॒प्रथ॑स्त॒मे" अशी होते.
 श्रुतीत आढळणारे त्वन तीन प्रकारचे अथवा, अनुदात्ताचे दोन भेद मानिल्यास, चार प्रकारचे आहेत. ["स्वर" ह्या शब्दाच्या "अच्" (vowel) आणि "ध्वनिविशेष" (accent) ह्या दोन निरनिराळ्या अर्थांचा घोंटाळा होऊं नये ह्मणून इतःपर accent ह्या अर्थी "स्वन" शब्दाची व vowel ह्म० "अच्" ह्या अर्थी "स्वर" शब्दाची योजना केली आहे.] पहिल्या स्वनभेदाचें नांव "उदात्त" असे आहे. ह्यास "उदात्त" असे नांव पडण्याचे कारण असे की त्याचा उच्चार नेहमींच्या सामान्य स्वनापेक्षां उंच अथवा खड्या आवाजांत करावयाचा असतो. दुसरा स्वनभेद "अनुदात्त." त्याचा उच्चार उच्च नसून गभीरही नसतो तर सम असतो. शब्दांचा सामान्य स्वन अनुदात्त हाच मानिला आहे. अर्थात् अनुदात्तापेक्षां उंच स्वरांत ह्मटलेला उदात्त व ज्यास्त दाबून ह्म० गभीर सुरांत ह्मटलेला अनुदात्ततर होय. अनुदात्ततर हा उदात्ताच्या अगदी उलट दिशेचा आहे; उदात्त हा अनुदात्तापेक्षां जितक्या मानाने उच्च आहे तितक्या मानाने अनुदात्ततर हा अनुदात्तापेक्षां गभीर आहे. ध्वनीचा शेवटचा भेद स्वरित हा होय; व उदात्त आणि अनुदात्त ह्यांच्या संयोगाने झालेल्या स्वरांत त्याचा उच्चार करावयाचा असतो.
 श्रुतीतील स्वरप्रक्रियेत ॒ व ॑ अशी स्वनदर्शक दोन चिह्ने आहेत. पहिले चिह्न लिहिणे असल्यास ते नेहमी अक्षराचे खालींच लिहिले पाहिजे, व दुसरे चिह्न करावयाचे असल्यास ते फक्त अक्षराचे शिरोभागींच केले पाहिजे. अक्षराच्या खाली लिहिण्याचे चिह्न केलेली अक्षरें अनुदात्त अथवा अनुदात्ततर असतात. अक्षराच्या शिरोभागी लिहिण्याची खूण ज्याच्या माथ्यावर केलेली असते तें अक्षर स्वरित आहे असे समजावें; जसे दैव्यानि अनुदात्त अक्षरांस प्रायः