पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्ञान झालेले असेल तेव्हां एकादें पूर्वी माहीत नसलेले पद दुसऱ्याच्या साहाय्यावांचून ओळखितां येईल. एकंदरींत, पदपाठाची संहिता करण्यापेक्षां संहितेची पदविवृति करणे फार अवघड आहे. वैदिक संधींचे कांही विशेष व स्वरांच्या संधींचे नियम अवगत असले ह्मणजे वियुक्त पदांचा संहितापाठ सहज करितां येईल. तेव्हां वैदिक संधींविषयी एक दोन विशेष येथे अगोदर सांगणे योग्य आहे.
 वैदिक संधींमध्ये आणि लौकिक संस्कृत संधींमध्ये फारसा भेद नाहीं. परंतु ज्या ठिकाणीं दोहोंमध्ये भिन्नत्व आहे त्यांत "अ"काराच्या लोपास बरेंच महत्त्व आहे. लौकिक संस्कृतांत विभक्त्यन्त "ए" किंवा विसर्गजनित "ओ" त्यांच्यापुढें "अ" आल्यास त्याचा लोप झालाच पाहिजे असा नियम आहे. तसा सार्वत्रिक नियम वेदांत आढळत नाही, हा एक मोठा विशेष वैदिक संधींचा आहे. श्रुतीतील ऋचांच्या चरणांतील अक्षरें पुष्कळ वेळां अनियत असतात व त्यायोगानें अर्वाचीन दृष्टीने होणारा छंदोभंग कांही विशिष्ट अक्षरांचे उच्चार कमजास्त करून करावा लागतो. अशा वेळी ह्या "अ" च्या लोपालोपाचा मोठा उपयोग होणारा असल्यामुळे, व पदपाठाचा संहितापाठ उत्तम रीतीनें करितां येण्यास, ह्या "अ"काराच्या विवक्षित स्थली होणाऱ्या लोपांच्या ज्ञानाची फार अवश्यकता आहे. "ए"कारान्त किंवा "ओ"कारान्त शब्दांपुढे येणाऱ्या "अ"काराचे लोपासंबंधी पुढील सामान्य नियम श्रुतीत दृष्टीस पडतात. त्या नियमांस अपवाद आहेतच, परंतु ते फार नाहीत:-
 "ए"कारान्त अथवा "ओ"कारान्त पद पादाच्या शेवटी असून त्याच्यापुढील पादाच्या आरंभी "अ"कार असेल तर त्याचा लोप होतो. उदा०-
 जी॒वात॑वे प्रत॒रं सा॑धया॒ धियोऽग्ने॑ स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ।;
 स नः पितेव सूनवेऽग्ने' सूपायनो भव ।; श्रेष्ठं॑ स॒वं स॑वि॒ता सा॑ति॒षन्नो॒ऽ॑मीदो ध॒र्मः इ.