पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाग पडावें हें त्याहून आश्चर्य आहे. वेदकाळी ह्मणजे भाषाभिवृद्धीचे स्वभावसिद्ध नियम आतांपेक्षां निराळे होते असा अर्थ नाहीं, मग प्रत्यक्ष प्रमाण टाकून व्यर्थ कल्पना करण्याच्या भानगडींत कां पडावें हें समजत नाहीं. ह्या वादाचा प्रत्यक्षप्रमाणानेंच पूर्ण निरास होत आहे. स्वर हे भाषेच्या परिपोषाचे प्रथमस्वरूपनिदर्शक आहेत, ह्मणून पूर्ण दशेस पोंचलेली कोणतीही भाषा घ्या, जोपर्यंत तिच्या इतिहासांत ती भाषा बोलणारीं मनुष्यें कवितेमध्ये सुरावर भाषणे करीत असल्याचा पुरावा व अनुभव नाहीं तोपर्यंत श्रुतीतील एकाद्या शब्दाच्या स्वरूपावरून काढलेल्या वादग्रस्त व संशयित कल्पनांची यत्किंचितही प्रतिष्ठा नाहीं.
 बौद्धमताचें प्राबल्य आर्यावर्तत झाले त्यावेळी सामान्यजनसमूहांत संस्कृत भाषेचा प्रचार बंद पडला असल्याकारणानें, संस्कृत भाषण करितां येत असलेल्या लोकांतही ती भाषा स्वरयुक्त बोलण्याचा परिपाठ नाहींसा झाला होता असें त्यावेळी रचले गेलेल्या ग्रंथांवरून उघड दिसून येते. अर्थात् जो प्रकार भाषेमध्ये ऊर्जस्विता येण्यासाठी उत्पन्न झाला होता व जो वाक्शतीचें जीवितचिह्न असल्यामुळे जो केवळ भाषणांत आढळून येणारा असतो, त्या प्रकारास संस्कृत भाषणाचा प्रघात बंद झाल्यावर ग्रंथांतून फांटा मिळाला ह्यांत आश्चर्य नाहीं. श्रुतींतील कांही ब्राह्मणांतून व उपनिषदांतून ऋक्संहितेप्रमाणें स्वरचिह्ने लिहिण्याचा संप्रदाय नाहीं, तरी देखील अशा ब्राह्मणांची व उपनिषदांची भाषा सस्वर असल्याविषयीं पाणिनीय सूत्रपाठांत प्रमाण आहे.
 हें संस्कृत स्वरशास्त्र विस्तृत पण पद्धतशीर आहे. परंतु त्याचे समग्र विवरण करण्याचें येथे कारण नाहीं. श्रुतीचा अभ्यास उत्तम प्रतीचा होण्यास संहितेचा पदपाठरूप विच्छेद व पदपाठाचा संहितारूप संयोग बिनचूक करितां येणें अवश्य आहे. ह्या उद्देशास अनुसरून वैदिक ऋचांचा पदविच्छेद किंवा पदसंयोग करितांना शब्दांच्या स्वरांमध्ये काय काय फेरफार करावे लागतात त्यांचा मुख्यत्वे येथे विचार केला आहे.