पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हेतच, परंतु आपल्या भाषणाचा ठसा दुसन्याच्या मनावर उमटविण्याचें एक जबरदस्त साधन आहेत. जसजशी भाषा परिपक्क होत जाते तसतसे आपले विचार दुसऱ्यास कळविण्यावरच काम भागेनासें न होतां ते विचार त्याचे मनावर बिंबविण्याच्या अगर त्याचे मनोविकार जागृत करण्याच्या इच्छेचा प्रादुर्भाव होतो. स्वरभिन्नत्व हा तिचा प्रथम परिणाम होय. एकस्वरता अथवा एकतानता ही साहजिक कंटाळवाणी असते, तिच्यामुळे भाषण लक्ष्यपूर्वक ऐकण्याकडे मनाची प्रवृत्ति होत नाहीं, ह्मणून मनुष्य आपल्या भाषणांत उच्च गभीर स्वरांचा उपयोग करूं लागतो. हाच स्वरपद्धतीचा प्रथमारंभ आहे. स्वर हे एका संस्कृत भाषेतच नव्हे तर परिपक्क दशेस पोचलेल्या अन्य भाषांतही आढळतात त्याचें तरी कारण हेच आहे.
 स्वर हा भाषेचा नैसर्गिक परिणाम असल्याचें वर सांगितलेच आहे. जमिनीच्या उंचसखलपणामुळे ज्याप्रमाणें सृष्टीस एक प्रकारचें सौंदर्य प्राप्त होतें, त्याचप्रमाणे भाषेस व विशेषेकरून कवितेस स्वरांच्या उच्चारांतील स्वाभाविक उच्चनीचभावामुळे मनोहरत्व येतें. ह्या कारणास्तव वैदिक संस्कृतांत स्वरांचे जे भिन्नभिन्न प्रकार आहेत त्यांस शास्त्रकारांनी अन्वर्थक नांवें दिली आहेत. कवितेंतील स्वरांच्या ह्या उच्चनीच भावास ग्रीक भाषेमध्यें arsis व thesis अशी जी नांवें आहेत त्यांचा अर्थही संस्कृत संज्ञांच्या अर्थाप्रमाणेच आहे हीही एक लक्ष्यांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे. हीं ग्रीक नांवें तदर्थक संस्कृत संज्ञांचें भाषांतर असण्याचा बराच संभव आहे.
 कांही पाश्चात्य पंडितांनी वैदिक ऋचांची उत्पत्ति प्रथम झाली किंवा स्वरांची उत्पत्ति प्रथम झाली असा एक चमत्कारिक वाद उपस्थित करून पुष्कळांनीं ऋचांनंतर स्वरोत्पत्ति झाली असावी असें अनुमान करण्यास आधार आहे असा आपला अभिप्राय दिला आहे. असा विचित्र वाद उपस्थित व्हावा हेच आश्चर्य आहे, परंतु त्यांतही ह्या गोष्टीच्या निर्णयास अनुमानें व कल्पना करणे