पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


उदात्त, अनुदात्त आणि स्वरित.




 भाषण करितांना शब्दांतील कांही विवक्षित अक्षरें जोर देऊन अथवा दुसऱ्या एकाद्या विशिष्ट रीतीनें उच्चारण्याचा प्रचार प्रगल्भ दशेस येऊन पोचलेल्या बहुतेक भाषांमध्ये आहे. अक्षरांच्या स्वनविशेषास स्वर (accent) अशी पारिभाषिक संज्ञा आहे. स्वर हा ध्वनीचीच एक प्रकारची विक्रिया असून तो मनुष्याच्या शरीररचनेवर, परिस्थितीवर, व एकाद्या विशिष्ट संप्रदायाच्या अभ्यासावर पुष्कळ अंशी अवलंबून असतो. ब्राह्मण लोकांच्या व यूरोपियन लोकांच्या संस्कृतशब्दोच्चारांत जो विशेष फरक नजरेस येतो त्याचें कारण ह्यांतच आहे. स्वरांचें महत्त्व इंग्रजीभाषाभिज्ञांस सांगण्याची अवश्यकता नाहीं. स्वरांच्या योगानें भाषेस जास्त सौष्टव येत असून शिवाय त्यांच्यावांचून शब्दोच्चारांत स्वारस्य उत्पन्न होत नाहीं. ज्या भाषेत निरनिराळे स्वर नसतात ती भाषा प्रायः अपरिपक्क व निःसत्त्व असते. कारण स्वर हे शब्दोच्चाराचें प्रधान अंग असून भाषेत असलेल्या जोमाची एक अत्युत्तम साक्ष होत. भाषेचे खरे स्वर, ती ज्यांची जन्मभाषा असते, त्यांच्या तोंडीं असतात; ह्यावरून जरी स्वर हे भाषेचें एक स्वाभाविक अंग आहे, तरी त्यांची उत्पत्ति भाषेच्या उत्पत्तीबरोबरच झाली असली पाहिजे असें नाहीं. जी भाषा बाल्यावस्थेत असते, ह्मणजे जींत शब्दांचा भरणा फार कमी असून जिची मजल अगदी सामान्य प्रतीच्या व्यावहारिक गोष्ठी व्यक्त करण्यापलीकडे गेलेली नाही, अशी भाषा किती साधी व असंस्कृत असते हें ज्यांस माहीत आहे त्यांस वरील लिहिण्याचें यथार्थत्व कळून येईल. भाषेचा उत्कर्ष होण्यास आरंभ होऊं लागतांच स्वरांचा उद्भव होऊन त्यांचा उत्तरोत्तर ज्यास्त प्रचार होऊं लागतो. स्वर हे भाषेचेंच एक स्वरूप असल्यामुळे ते कृत्रिम तर