पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आणखीही एका गोष्टीकडे आपण जरा विशेष लक्ष्य पोचविले पाहिजे. ती ही कीं, जर सायणाचार्यांचा अर्थ अजीबाद नामंजूर करावयाचा व त्या ऐवजों यूरोपिअन् टीकाकारांचा अर्थ ग्राह्य धरावयाचा, तर त्या यूरोपिअन् टोकाकारांत तरी एक मत असतें ह्मणजे त्यांचा अर्थ खरा मानून चालण्यास हरकत नव्हती. परंतु वस्तुस्थिति अशी येऊन पोंचली आहे की त्यांच्यात्यांच्यातच अतिशय मतभेद उत्पन्न झाले आहेत. इतकेच नव्हे, तर कांही कांही विद्वानांनी एका ठिकाणी एका ऋचेचा एक अर्थ तर दुसऱ्या ठिकाणी त्याच ऋचेचा दुसरा अर्थ केला आहे. पीटर्सन तर इतका चतुर आहे की, एका शब्दाचा, आपल्या टीपांमध्यें तो एक अर्थ देतो तर भाषांतरांत अगदी निराळाच अर्थ देतो. हे सर्व प्रकार डा० पीटर्सनचें पुस्तक वाचले ह्मणजे सहज लक्षांत येतील.
 आपली घमेंड मिरवून लोकांना तुच्छ करून टाकणे हा बहुतेक यूरोपिअन् ग्रंथकारांना मोठा दुर्गण जडलेला दिसतो. सायणाचार्यांनी जें भाष्य केलेले आहे त्याच्या योग्यतायोग्यतेविषयी वरती विवेचन केलेंच आहे. तथापि त्यांतूनही, सायणाचार्यांचा अर्थ प्रामाणिकपणानें कोणी नापसंत ठरविल्यास त्याबद्दल कोणासही दोषी ह्मणतां येणार नाही. परंतु चिरड आणण्याजोगी गोष्ट एवढी आहे की पीटर्सनसारखे लोक सायणाचार्यांचा अर्थ आपणांस नापसंत आहे एवढेच ह्मणण्यावर संतुष्ट नाहीत. त्यांचा हेतु सायण, हा एक कोणी मूर्ख मनुष्य होता, त्याच्या वांट्यास ब्रह्मदेवानें अक्कल हा पदार्थ दिलाच नाहीं, असे पदोपदी दर्शविण्याचा आहे. यूरोपिअन् ग्रंथकारांचा अवतार होऊन आमच भाग्योदय झाला असो किंवा नसो, परंतु एवढी मात्र गोष्ट अगदी खरी आहे कीं, केवळ आपला आणि दुसऱ्या एका ग्रंथकर्त्याचा मतभेद आहे ह्मणून, जशी पीटर्सननें सायणाचार्यांचा उल्लेख करितांना भाषा वापरली आहे तितकी इलकी भाषा, कोणाही सभ्य गृहस्थानें दुसऱ्या कोणत्याही ग्रंथकारासंबंधानें वापरली नसती. एकीकडे सर्ववन्द्य असे सायणाचार्य व दुसरीकडे एक सामान्य