पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चांगले कळतें तर वेदांचें तत्व हाडाच्या हिंदु अशा निष्णात विद्वानासच विशेष चांगलें समजले असले पाहिजे. ही गोष्ट इतकी उघड असतांना कांहीं लोक यूरोपिअन् विद्वानांनीं केलेला अर्थ, तो कितीही विसंगत असला तरी, अगदी श्रुतितुल्य मानून चालतात ह्याचें मोठे आश्चर्य वाटते. ह्यास मतस्वातन्त्र्य असे नांव देऊन स्वातन्त्र्याची थट्टा करण्यापेक्षां मतपारतन्त्र्य हें नांव किती तरी अन्वर्थक होईल बरें ? इंग्रजी ग्रंथावर एखाद्या एतद्देशीय गृहस्थानें केलेल्या टीकेकडे इंग्रज लोक ढुंकूनही पहात नाहींत असा प्रत्यक्ष अनुभव आहे, आणि आमचे लोक सर्वस्वी परकीयांच्या भजनीं लागून आपल्या अगदी वन्द्य मानलेल्या पुरुषांना मूर्ख ह्मणण्यास उयुक्त होतात ह्यापेक्षां अधिक प्रखर परवशता ती कोणती ?
 तिसरें असें आहे कीं, वेद हा धर्मग्रंथ असल्यामुळे धर्मज्ञानावर ज्याचा व्यासंग अधिक त्याचें मत तितक्या मानानें अधिक ग्राह्य असले पाहिजे. वेदभाष्यकार तर स्वतः संन्यासी असून शांकरमताचे एक विख्यात अनुयायी होते. ह्यावरून ह्याही दृष्टीने पाहिले असता त्यांच्या भाष्याचे महत्त्व विशेषच आहे. शिवाय आतांप्रमाणे त्या वेळचे ब्राह्मण कर्मभ्रष्ट नसल्याकारणाने ज्या कित्येक गोष्टींची आपण ओळखही विसरून गेलो आहोत त्या गोष्टी त्या वेळी प्रत्यक्ष प्रचारांत होत्या.
 चवथें असें आहे की, वेदाचा अर्थ परंपरागत चालत आलेला आहे. यूरोपांत ज्याप्रमाणें वेद आकस्मिक जाऊन पडले त्याप्रमाणे आपल्या देशाची स्थिति नसून प्राचीन काळापासूच येथें वेदांच्या अर्थाची परंपरा चालत आलेली आहे. तोच अर्थ सायणाचार्यांनी लिहून ठेविला असला पाहिजे. ह्यावरून वेदाचा अर्थ अगदी पूर्वीपासून लोक कसा करीत आलेले आहेत त्या मुद्द्यावरी बराच प्रकाश पडतो.