पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सायणाचार्यांची विद्वत्ता किती अलौकिक होती व त्यांचा वेदांवर अभिकार केवढा मोठा होता ह्याचें वर्णन येथें देण्याची गरज नाहीं. त्याकरितां एक निराळी पुरवणीच जोडली आहे. ह्या पुस्तकांत दिलेली ही सायणाचार्यांची माहिती "विविधज्ञानविस्तारां"तून घेतलेली आहे. सायणाचार्यासारख्या विद्वान् व देशाभिमानी पुरुषाचें चरित्र वाचलें ह्मणजे ज्याचे मनांत पूज्यभाव उत्पन्न होत नाहीं व ज्याचे मुखांतून धन्योद्गार निघत नाहीत असा पुरुष विरळाच असेल.
 सायणाचार्याची टीका ह्मणजे त्या अलौकिक पुरुषाचा महाप्रसादच ह्मणावयाचा त्यांनी हें महत्कार्य करून सर्व जगावर कायमचेच उपकार करून ठेविले आहेत. सायणाचार्याची टीका जर आजमित्तीस नसती तर वेदांच्या अर्थासंबंधानें निबिड अंधकार खचित माजला असता. परमेश्वरकृपेनें तसा प्रसंग आला नाहीं हें आपले मोठे भाग्यच समजले पाहिजे.
 सायणाचार्यांच्या टीकेला मान देण्याचे पहिले कारण असे आहे की ती एका महापंडिताने लिहिलेली आहे. तिला अल्पज्ञ माणसांनी सहज झुगारून देणें ह्यापेक्षां दुसरे धाष्टर्य क्वचित्च असेल.
 दुसरे असे आहे की, सायणाचार्य ह्यांनी ज्या ग्रंथावर व ज्या भाषेत आपले भाष्य लिहिलें तो ग्रंथ व ती भाषा ज्या लोकांमध्ये उगम पावली त्या लोकांपैकीच ते स्वतः एक होते. त्यामुळे त्यांना जसा तो मूळ ग्रंथ समजला असेल तितका तो परकीय लोकांना- मग ते कितीही विद्वान असोत-समजला असेल असे मानण्यास मन धजावतच नाही. इंग्रजी ग्रंथ जर इंग्रजी विद्वानानांच विशेष चांगले समजतात, फ्रेंच ग्रंथ जर जर फ्रेंचपंडितांइतके चांगले कोणाला समजत नाहींत, जर्मन् ग्रंथांतील रहस्य जर जातीच्या जर्मनाइतके इतर कोणाला सांगता येणार नाहीं, तर अर्थात्च हिंदु ग्रंथांचा अर्थ हिंदु पंडितच उत्तम जाणूं शकतील हे उघड आहे. शेक्सपीअरचें तत्व हाडाच्या इंग्रजासच जर जास्त