पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देतां आली, तोच प्रसंग सध्या आलेला आहे. अर्थात् येथें तोच उपाय योजिला पाहिजे. "प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु" हें हिंदुधर्माचें एक मुख्य लक्षण आहे. ती प्रामाण्यबुद्धि वेदांचें नीट अध्ययन केल्यावांचून कधीही दृढ होणार नाही.
 परधर्माशी टक्कर देण्याची गोष्ट बाजूला राहो, परंतु नुस्ती आपल्या समाजाची जरी सद्यःस्थिति लक्षांत घेतली तरीही वेदांचें अध्ययन प्रस्तुत काली किती उपयोगी आहे हे लक्षांत येईल. सध्यांचे काळी आपणां हिंदुलोकांमध्ये मोठमोठे सामाजिक प्रश्न उपस्थित झालेले आहेत व त्यांवरून फार मोठे कडाक्याचे वादविवाद होत आहेत. त्या वादांचा निर्णय होण्यास वेदांशिवाय दुसरे साधन नाहीं. परंतु त्या वेदांचा अर्थच जर दोन्ही पक्षांकडील लोकांना माहीत नसला तर तो वाद अगदी कुचकामाचा ठरेल हे उघड आहे. ॲनी बिझांटसारख्या परस्थ स्त्रीला आर्यधर्माचे पूर्ण ज्ञान असावें व आपण मात्र वेडगळाप्रमाणें आश्चर्यचकित होऊन तिच्या तोंडाकडे नुसतें पहात रहावें ह्यापेक्षां शरमेची गोष्ट दुसरी कोणतीही नसेल.
 ह्या सर्व कारणांकरितां वेदांचा अभ्यास करणें हें हिंदुमात्राचें आद्य कर्तव्य आहे हें कोणासही दिसून येईल. परंतु वेदांचा अर्थ समजून घेण्याची कल्पना कायती सध्यांच्याच लोकांना सुचली आहे- वेद पाठ करण्यापेक्षां आपले कांही जास्त इतिकर्तव्य नाहीं अशीच सर्व जुन्या लोकांची समजूत होती — असे मात्र ह्मणतां येणार नाहीं. श्रीशंकराचार्यांची तर गोष्टच राहो; परंतु सायणाचार्यांच्या काळापर्यंतही वेदपारंगत असे मोठमोठे विद्वान हयात होते असे दिसतें. सायणाचार्यांना होऊन गेल्यास आज कांही फार शतकें लोटली आहेत असें नाहीं. अर्थशून्य वेदपाठकाला "निरुक्त"कार यास्काचार्योनी "स्थाणुरयं भारहारः" असें ह्मटले आहे तें लोकांचे लक्षांत आणून द्यावें ह्मणून ह्या सायणाचार्यांनी सर्व वेदांवर भाष्य करून ठेविलेले आहे. तेव्हां त्यांचे किती उपकार मानिले पाहिजेत बरें !