पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६

पंडित ह्यांचे उपकार मानिले पाहिजेत. त्या प्रस्तावनेच्या पूर्व भागांत अवतरणचिह्नान्तर्गत जो मजकूर आहे तो सर्व "वेदार्थयत्न" पुस्तक ३ अंक १ ह्यामधील घेतला आहे.
 ह्यापुढे श्रीकाशी येथील तपोनिधि विरक्त स्वामी त्यांस वंदन करणे योग्य आहे. असले पुरुष असल्या कामी मन घालीत नसतात असा सामान्य नियम आहे. तेव्हां ह्यावरून ह्या यतींची योग्यता कांही विशेष आहे असे कोणास वाटणार नाहीं ? सायणभाष्यामध्ये ज्या कांही शंका होत्या त्यांचें समाधान वे० शा० पंढरीनाथशास्त्री ह्यांचेकडून झालें, ह्मणून त्यांचे मी मोठ्या मनोभावानें आभार मानितों. ह्यानन्तर माझे पूर्वोक्त विद्वान् मित्र रा. रा –परंतु त्यांची जर इच्छा नाहीं तर त्यांचा नामनिर्देश करून थोडक्याकरितां त्यांची मर्जी कां मोडावी ?– ह्यांचें तर मला सर्वथैव साहाय्य झाले आहे. तें शब्दांनी किती व्यक्त करावें? रा. रा. सातवळेकरांचा निबंध "विस्तारा" वरून घेतला आहे, त्यांचेही ह्या प्रसंगी आभार मानणें योग्य आहे. शेवटी "इंदुप्रकाश" नें हें पुस्तक काळजीनें छापून दिलें व एका मित्रानें प्रुफांची सर्व जबाबदारी आपण होऊन आपल्या अंगावर घेतली, त्याबद्दलही मला फार कृतज्ञ राहिलें पाहिजे. जोपर्यंत आपल्या देशांत कंपाझिटरनां बेताबेताचेंच वेतन मिळत आहे तोपर्यंत मुद्रणदोष हे इकडच्या पुस्तकांत राहणारच. ते कांही केल्या चुकत नाहींत. तेव्हां त्याबद्दल माझ्या प्रिय वाचकांची पुन:पुन्हां क्षमा मागून हें पुस्तक सर्व विद्यार्थिवृन्दास मी मोठ्या प्रेमानें अर्पण करितों.

पुस्तककर्ता. 

 ह्या पुस्तकासंबंधी कोणी कांहीं सूचना केल्यास त्याबद्दल मी त्यांचा फार आदरपूर्वक विचार करीन.