पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४

 बायबलासारख्या १०००/१२०० पानांच्या प्रचंड ग्रंथांतील वेचे काढून उद्यां जर कोणी २५/३० पानांचें क्षुद्र पुस्तक लिहिलें व त्यांत जर त्यानें "अगे माझ्या बहिणी ! अगे माझ्या नवरी!" अशीं सालोमनाचीं गीतें घातली, अथवा, डेव्हिड राजाचा पुत्र जो अम्नान ह्याने आपल्या सावत्र बहिणीशीं केलेल्या पाजीपणाचा वृत्तान्त घातला, अथवा लोट हा द्राक्षारसानें धुंद होऊन पडला असतांना त्याच्या मुलींनी त्याच्या बगलेत शिरून त्याच्यापासून पुत्रोत्पत्ति कशी करून घेतली ह्याचें वर्णन घातले तर त्यानें बायबलाविषयीं यथार्थ कल्पना वाचकांस करून दिली असें ख्रिस्ती लोकांना वाटेल काय ? किंबहुना त्यानें आपले कर्तव्य इमानें इतबारें बजावलें असें होईल काय ? असो.
 हा शेवटचा मुद्दा अर्थातच मुख्य नाहीं. सौजन्य अथवा दौर्जन्य धारण करणें हें ज्याच्या त्याच्या मर्जीचे काम आहे व तो तें आपापल्या योग्यतेप्रमाणे करीत असतो. वर निर्दिष्ट केलेल्या सूक्ताचें पीटर्सनचें भाषान्तर त्याज्य आहे असें जें आह्मी ह्मणतो त्याची कारणें पुन्हां थोडक्यांत खाली लिहितों ह्मणजे आमच्या ह्मणण्यांतील मतलब स्पष्ट रीतीनें लक्ष्यांत येईल:-
 (१) वरील सूक्त स्तुतिपर आहे. त्याचा निन्दापर अर्थ करणे अगदी अयोग्य आहे.
 (२) "मातुर्दिधिषु" ह्याचा डा० पीटर्सनप्रमाणें अर्थ केल्यास त्यामध्ये पूषाची स्तुति घडते असे कोणत्याही तऱ्हेनें ह्मणतां येणार नाहीं.
 (३) त्या शब्दांचा चांगला अर्थ करता येतो. असे असून वाईट अर्थ करणे योग्य नव्हे.
 (४) असे यौगिक अर्थ पुष्कळ ठिकाणीं यूरोपियन ग्रंथकारांनींही केलेले आहेत.
 (५) इतक्यावरही त्यांचें समाधान तशा अर्थानें होत नसले तर इतर स्थळांप्रमाणें हेंही स्थळ प्राचीनत्वेंकरून दुर्ज्ञेय असें मानणें सुज्ञपणाचें होय.