पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३

ह्मणजे "सामर्थ्ययुक्त" आणि "शतक्रतु" ह्मणजे "अमितवीर्य" असे त्या शब्दांचे वस्तुतः अर्थ आहेत असें विद्वानांचे मत आहे. तें कसेही असले तरी त्याबद्दल आमचं कांही ह्मणणें नाहीं. आमचा मुख्य प्रश्न असा आहे कीं, "शचीपति" आण "शतक्रतु" ह्यांचा रूढ अर्थ खोटा असून त्याचा खरा अर्थ निराळा असावा अशी जशी त्या विद्वानांची कल्पना झाली— आणि तो खरा अर्थही असा असून की जो ऐकल्याबरोबर हा अर्थ लक्षणेने केला आहे असे एखादा अपरिचित मनुष्य ह्मणेल– तर त्याच न्यायानें, आपल्या समजुतीप्रमाणे "मातुर्दिधिषु" ह्याचा अर्थ जर इतका ओंगळ व हिडिस होत आहे तर हा खरा अर्थ नसावा व खरा अर्थ कांहीं निराळाच असावा अशी शंका ह्या विद्वानांना कां आली नाहीं व येऊ नये ? ह्याचें खरें कारण काय असावें बरें ?
 पीटर्सननें ह्या ऋचेचें हें ओंगळवाणें व खोटें भाषांतर केलें, इतक्यावरच सर्व गोष्ट भागते असें नाहीं. ज्या अर्थी त्याने हें असें भाषान्तर केले आहे त्या अर्थी तोच त्याचा खरा अर्थ आहे अशी त्याची खरी समजूत होती असे आपण गृहीत धरून चालूं. तथापि पुन्हां असा प्रश्न उद्भवतो की ऋग्वेदाचें स्वरूप अंधुक रीतीनें तरी विद्यार्थ्याच्या लक्षांत यावें ह्या पवित्र उद्देशानें जर डा० पीटर्सनने हें पुस्तक मुद्दाम रचलें आहे व ह्या पुस्तकांत ऋग्वेदासारख्या प्रचंड ग्रंथांतून त्यानें जर फक्त ३४ च निवडक सूक्तें घेतली आहेत तर हें सूक्त ह्या एवढ्याशा लहान पुस्तकांत त्यानें कां घातलें बरें ? हें सूक्त जर त्याच्या मतानें वाईट होतें तर ह्या सूक्तावांचून दुसरी चांगली सूक्त त्याबद्दल डा० पीटर्सनास सांपडली नाहींत काय ? हें सूक्त जर त्याच्या मतानें वाईट होतें तर ह्या सूक्ताच्या योगानें सबंध ऋग्वेदाविषयी आपण विद्यार्थ्यांची मनें नाहक कलुषित करीत आहोत असें त्याच्या मनांत कधी आलें नाहीं काय? हें सूक्त जर त्याच्या मतानें वाईट होतें तर ह्या सूक्ताच्या योगानें आपण विद्यार्थ्यांना विनाकारण ऋग्वेदाच्या अभ्यासापासून परावृत्त करण्याला कारणीभूत होत आहोत ही कल्पना पीटर्सनच्या मनास कधीही शिवली नाहीं काय ?