पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२

मध्ये पूषाची स्तुति केली आहे, तेव्हां ज्यास भाषान्तर करणे म्हणजे काय ह्याची थोडीशी तरी ओळख असेल तो मुळामध्ये स्तुति असतांना तिचें भाषान्तर निन्दात्मक करील असें मुळींच संभवत नाहीं. "मातुर्दिधिषु" ह्म. "मातेशीं गमन करणारा" असा पीटर्सनच्या भाषान्तराप्रमाणे अर्थ होतो, त्यामुळे हें विशेषण स्तुत्यर्थ आहे अशीही कल्पना करितां येत नाहीं, व तें स्तुत्यर्थ आहे असें ह्मणण्यास कोणी धजावेल असेंही वाटत नाहीं. कोणीकडूनही विचार केला तरी पीटर्सनचें भाषान्तर निंद्य व त्याज्य आहे असेच ह्मणावे लागते. तेव्हां ह्या पदांचें भाषान्तर भाष्याप्रमाणे करणें हा तरी एक पक्ष दिसतो अथवा डा० पीटर्सनसारख्या आग्रही लोकांनी असल्या भाषान्तराच्या भानगडीत पडूं नये हा तरी दुसरा पक्ष दिसतो त्याशिवाय तिसरा मार्ग दिसत नाहीं. "अमक्या शब्दाचा भाष्यामध्ये केलेला अमका अर्थ बरोबर दिसत नाहीं, तथापि ह्याच्या खऱ्या अर्थाचा आह्मांला उलगडा पडत नाहीं." असल्या विद्वत्तेच्या टीपा पीटर्सननें जागोजागी दिलेल्या आहेत. तेव्हां आह्मी सुचविलेला दुसरा पक्ष पीटर्सनला अगदीच अपरिचित होता असें नाहीं. इतर ठिकाणीं पीटर्सन ह्यास पुष्कळ शब्द अवघड व न समजणारे असे वाटले, परंतु तशांपैकींच "मातुर्दिधिषु" हें एक स्थल असावें असा डा. पीटर्सनला संशय देखील आला नाही हें थोडेंसें आश्चर्याचेंच आहे. एकूण, हिंदुधर्माचा संबंध आला की मोठमोठे नांवाजलेले विद्वान् लोकही चकून जातात ह्मणावयाचे ! ! !
 "शचीपति" आणि "शतक्रतु" हे दोन शब्द वेदामध्ये आणि अर्वाचीन संस्कृतामध्ये असे दोन्ही ठिकाणी पुष्कळ वेळां येत असतात. आतां "शचीपति" ह्याचा शब्दशः अर्थ "शचीचा पति" व "शतक्रतु" ह्याचा शब्दशः अर्थ "शंभर आहेत क्रतु ज्याचे" असा होतो हे उघडच आहे अर्वाचीन संस्कृत ग्रंथांत, इंद्राच्या पत्नीचें नांव शची आहे व इन्द्रानें शंभर यज्ञ केलेले आहेत, अशीच समजूत असलेली दृष्टीस पडते. परंतु ही समजूत वेडगळ असून "शचीपति"