पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०

धंदे सोडून देऊन आळशी बनले आहेत व इतर देशांतील चार वर्ण झपाटून उद्योग करीत आहेत. ही स्थिति पालटल्याखेरीज हिंदुस्थानच्या भाग्योदयाचा दिवस लवकर येणार नाहीं."
 वरील लेखाचें मनन प्रत्येकानें करणें अवश्य आहे. रे. कृष्णमोहन बानर्जी ह्या, अल्प वयांत बाटलेल्या, एका विद्वानाने लिहिलेले "Hinduism and Christianity" ह्या नांवाचें एक लहानसे पुस्तक आहे. त्यांतील लेखही ह्यासंबंधानें विचार करण्याजोगा आहे. हे पुस्तक Christian Tract Society कडे विकत मिळत असावें असे वाटते. व त्यावरून अल्पशिक्षणाने आणि एकतर्फी विचार ऐकल्यानें फसून जाऊन परधर्मात शिरलेले जे लोक असतात त्यांनी पुढे हिंदुधर्माचा अभ्यास केल्यास त्यांच्या अंतःकरणांत किती प्रकाश पडतो हें चांगले दिसून येतें. बाबू मजकुरांनी आपल्या अगदी लहान वयांत जर अविचारानें आपला धर्म टाकून दिला नसता तर ते उत्तर वयांत आर्य धर्नाला भूषणभूत होऊन बसले असते ह्यांत शंका नाहीं. शक्य असेल त्यांनीं वरील पुस्तक वाचल्याशिवाय राहूं नये.
 देवांनी पुरुषाला पशु कल्पून एक मोठा यज्ञ केला व त्या यज्ञामुळे सर्व भोग्य वस्तु व सर्व प्राणिवर्ग उत्पन्न झाला असे सातव्या व सातवीच्या पुढच्या ऋचांत वर्णन आहे. यज्ञामध्यें पशूचा बळि देतात हे प्रसिद्धच आहे व त्यावरून पुरुष हा वरील यज्ञांत बळि गेला हें वरील वर्णनावरून सिद्ध होते. सर्व मनुष्यजातीचा उद्धार व्हावा ह्मणून ज्याप्रमाणे ईश्वराचा पुत्र येशूख्रिस्त हा बळि गेला त्याप्रमाणेंच सर्व मनुष्यजातीच्या कल्याणार्थ पुरुष ह्मणजे ईश्वर हा स्वतः बाळि गेला असावा व त्यावरून आत्मत्यागाचें जें अत्युच्च तत्त्व ख्रिस्तीधर्मात सांगितलेले आहे त्याचा उल्लेख आर्यधर्माच्या आद्यग्रंथांतही सांपडतो असें बानर्जींच्या लेखांतील सार आहे. ही कल्पना फार बुद्धिमान् पणाची आहे, व त्यावरून त्या विद्वान् लेखकांची वेदविषयक आदरबुद्धि उत्तम रीतीनें व्यक्त