पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याचा सारांश येथें देणें अप्रासंगिक होणार नाहीं असें वाटतें, ह्मणून तो या पुढें देतों-
 "सूक्ष्म दृष्टीने पाहिलें तर पुरुषसूक्तामध्यें दोन देवता सांगितल्या आहेत असें आढळून येईल- (१) विराट् पुरुष व (२) पुरुष. श्रीमच्छंकराचार्यांच्या भाष्यावरून व ऋचा १३ वी आणि १४ वी ह्यांतील वर्णनावरून "विराट्" शब्द हा "विश्व" शब्दाचाच पर्याय आहे असें ह्मणावें लागते. "मनुष्य" हा शब्द उच्चारल्याबरोबर जसा शरीर व जीव ह्या दोहोंचाही बोध होतो, तसाच "विराट्" —"विश्व" –ह्या शब्दामध्ये जड व चैतन्य या दोहोंचाही समावेश होतो. तात्पर्य, जो कोणी सृष्टिनियन्ता सर्वव्यापी परमेश्वर आहे तोच हा पुरुषसूक्तांतील "विराट्" होय.
 आतां दुसऱ्या "पुरुष" ह्या देवतेचा संबंध पहावयाचा. ऋचा १ व १२ ह्यांमध्ये ह्याचें केलेले वर्णन व "सर्वप्राणिसमष्टीरूपः" असें श्रीमच्छंकराचार्यांचें ह्या शब्दावरील भाष्य, ह्यांवरून "पुरुष" ह्या शब्दाचा "देश" किंवा "राष्ट्र" असा अर्थ घ्यावयाचा असे दिसते.
 ह्यावरून पहातां पुरुषसूक्तामध्ये प्रथमतः "पुरुष"="राष्ट्र" ह्या देवतेचें, व नंतर "विराट्"="विश्व"="परमेश्वर" ह्या देवतेचें वर्णन आहे. दुसऱ्या देवतेची उपासना मानसिक करावयाची आहे. परंतु पहिलीची उपासना मात्र शरीर व मन ह्या दोन्ही साधनांनी करावयाची आहे.
 "राष्ट्रा"चे चार अवयव १२ व्या ऋचेत सांगितले आहेत. ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे होत. या चारी अवयवांनी आपापले काम नीट रीतीनें बजावीत असले पाहिजे. एकानेंही आळस करितां उपयोगी नाहीं. परंतु दुःखाची गोष्ट कीं, आपल्या देशाचे ते चारीही अवयव सध्या बंद पडल्यासारखे झालेले आहेत. चातुर्वर्ण्य फक्त हिंदुस्थानांतच आहे असें नाहीं. ते प्रत्येक राष्ट्रामध्ये आहेच. परंतु फरक इतकाच की, हिंदुस्थानांतील चार वर्ण आपापले