पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दुसरीकडे सायणाचार्यांचा वृत्तांत जो छापला आहे तो "विविधज्ञानविस्तार" ह्या प्रसिद्ध मासिकाच्या १८९९ च्या जुलैच्या अंकांत "विजयानगरचें प्राचीन हिंदु साम्राज्य" ह्मणून जो एक सुंदर लेख आला होता त्यांतून घेतलला आहे. "पंचदशी" ह्या ग्रंथाचें इंग्रजी भाषांतर नन्दलाल ढोल (धवल ?) एल. एम्. ॲण्ड एस्. ह्या बंगाली विद्वानांनीं केलेले आहे, त्यांतही सायणाचार्यांची थोडीशी माहिती दिली आहे. परंतु त्यापेक्षां "विस्तारा” ची माहिती विस्तृत असल्या कारणानें तीच देणे येथें योग्य वाटलें. ह्याच संबंधानें श्रीक्षेत्र काशीसही कांहीं माहिती मिळेल असे वाटल्यावरून एका परमपूज्य व सर्वसंगविवर्जित अशा थोर स्वामीमहाराजांस विनंति केली होती. त्यांनी ती मोठ्या कृपाळूपणानें मान्य करून माहिती पाठविली. तीमधील विशेष भाग असा आहे की "शंकराचार्यांपासून माधव अथवा विद्यारण्य हे दशम पुरुष होत. भगवद्गीतेवरच्या श्रीशंकरानन्दी टीकेंत जी ह्यांची परंपरा दिली आहे तीवरून विद्यारण्य हे दशम पुरुष येतात. वीरबुक्क राजाचे माधव हे दिवाण होते व सायणाचार्य हे माधवांचे वडील बन्धु होते. माधवांनी संन्यासाचे अगोदर जे ग्रंथ केले त्यांवर नुसतें माधव अथवा सायणमाधव असें नांव आहे, व संन्यासानन्तरच्या ग्रंथांवर त्यांचे "विद्यारण्य" हें नांव आहे." सायणाचार्यांचा वृत्तान्त अतिशय चित्ताकर्षक आहे असें कोणालाही वाटल्यावांचून खचित राहणार नाही.
 दहाव्या मंडलांतील ९० वें जें पुरुषसूक्त त्याविषयीं येथें दोन शब्द लिहिणें जरूर आहे. पुरुषसूक्तामध्ये मुख्यतः जगदुत्पत्तीचें वर्णन केलेले आहे. बायबलामध्ये ज्या प्रमाणे पहिल्या प्रथम "उत्पत्ती"चा भाग आहे, त्याचप्रमाणे वेदांमधील हे "उत्पत्ति" प्रकरण आहे असे ह्मणण्यास हरकत नाहीं. १८९९ सालच्या "विविधज्ञानविस्ताराच्या" एका अंकांत रा० रा० सातवळेकर ह्यांचा पुरुषसूक्तासंबंधानें एक विचार करण्याजोगा निबंध छापिलेला होता.