पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेदाचा झाला आहे. आतां, वृत्तभिन्नत्व इत्यादि कारणांमुळे "रघुवंशा" दि ग्रंथांचे असे भाग केले तर तें नीट दिसणार नाहीं ही गोष्ट वेगळी, परंतु ती अडचण वेदांच्या संबंधानें लागू नाहीं हे उघडच आहे. प्रत्येक अष्टकाचे पुन्हां अध्याय व अध्यायाचे वर्ग व वर्गाच्या ऋचा असे पोटभाग आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक मंडलाचींही सूक्तें व सूक्तांच्या ऋचा असे पोटभाग आहेत. ह्या पुस्तकांत मंडल -सूक्तें -ऋचा, अशाच पद्धतीचा अंगीकार केला आहे.
 वेद हा इतका प्राचीन ग्रंथ असतां वेदामध्यें पाठभेद नाहींत ही मोठी कौतुक करण्याजोगी गोष्ट आहे. "वेदासारखा अत्यंत पुरातन ग्रंथ इतक्या मोठ्या काळजीने जपून ठेविलेला, आणि प्राणापलीकडे मानून सांभाळिलेला, आणि त्यामुळेच प्रायः प्रमादांपासून मुक्त, अणि क्षेपकांनी दुष्ट न झालेला, असा धर्माचा अथवा काव्याचा अथवा दुसऱ्या शास्त्रावरचा ग्रंथ कोठेंच नाहीं ह्मटले तरी चालेल. निदान एवढा मोठा ग्रंथ तरी इतका शुद्ध, प्राचीनकाळी होता तसाच राहिलेला दुसरा नाहीं. तथापि कितीएक प्रसंगी सायणाचार्यांसारखे भाष्यकारही मुळाशीं भिन्न असा स्वरपाठ अथवा अक्षरपाठ घेऊन अर्थ करण्याची अवश्यकता . कबूल करितात." मंडल ७ सूक्त ८८ ह्या वरुणाच्या सूक्तांतील चवथी ऋचा हे अशांपैकीच एक स्थल आहे. येथे संहितेंत "स्वपा महोभिः" असे शब्द आहेत परंतु भाष्यामध्ये त्यांचे जागीं "स्वपां अवोभिः" असे शब्द मानिले आहेत. आतां अशा प्रकारचे मंत्र फारसे नाहींत, परंतु जे थोडे आहेत त्यांच्यासंबंधानें जरी शोध केला तरीसुद्धां निरनिराळ्या हस्तलिखित प्रतींत निरनिराळे पाठ लिहिलेले सांपडतील असे होणार नाहीं. उदारणार्थ वरील स्थलीं जरी भाष्यामध्यें "स्वपा महोभिः" ह्याचे जागी "स्वपां अवोभिः" असा पाठ असावा असें सूचित केले आहे, तथापि ऋक्संहितेची अशी कोणतीही पोथी सांपडणार नाहीं की जीमध्ये "स्वपां अवोभिः" असे लिहिलेले असेल. इतका या वेदांसंबंधाने कडकडीतपणा ब्राह्मणांना ठेविलेला आहे.