पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 यावरून, परकी विद्वानांत आणि देशी विद्वानांत किती मोठे अंतर आहे हें दिसून येईल यूरोपियन् लोकांच्या टीका आणि त्यांचे परस्परविरुद्ध असे अर्थ वाचले ह्मणजे मन गोंधळून जाऊन "नैको मुनियंस्य वचः प्रमाणं" असे वाटावयास लागतें व वेदाचा एकादा निश्चित अर्थ असूं शकेल कीं नाहीं ह्याविषयींही भ्रांति उत्पन्न होते. परंतु अशा निराशेने ग्रस्त होण्याचें कांहीं कारण नाहीं. आपले महाभाग्य की सायणाचार्यांसारखे भाष्यकार आपल्यांत निपजले व त्यांनीं मोठमोठे अमूल्य ग्रंथ लिहून ठेविले. त्यावरून निराशेला व भ्रमाला जागाच राहिली नाहीं. सायणाचार्यासारख्यांच्या ग्रंथांवरून आपणांस वेदाच्या खऱ्या अर्थाचा लाभ खचित होण्यासारखा आहे व असा लाभ विद्यार्थी लोकांना व्हावा ह्याच हेतूने हा प्रयत्न केलेला आहे. "शिकणें हें अवघड आहेच, परंतु त्यापेक्षांही विसरणें हें जास्त अवघड आहे" अशी जी इंग्रजीमध्ये ह्मण आहे त्या ह्मणीचा विचार केला असतां खोटी मतें व खोटे ग्रह अगोदरपासून धारण केल्याने आपला व आपल्याबरोबर लोकांचा कसा नाश होण्याचा संभव असतो हें चांगले कळून येणार आहे. यूरोपिअन् टीकाकारांच्या टीकांचा अभ्यास करणे चांगले आहे. त्यापासून बुद्धीला कुशाग्रत्वही प्राप्त होईल परंतु त्याच्यापूर्वी सायणभाष्याचें अध्ययन केलेले असणें फारच अगत्याचें आहे.
 ह्या पुस्तकांत विद्यार्थ्यांना सायणभाष्य अल्प प्रयासानें शिकतां यावें अशी तजवीज केलेली आहे. परीक्षेच्या घाईमुळे व इतर अभ्यासाचा मोठा डोंगर उरावर असल्यामुळे पुष्कळ लोकांना सायणभाष्य समग्र वाचण्यास सवड सांपडत नाहीं. कारण त्यास श्रम व वेळ फार लागतो. ही विद्यार्थ्यांची आपत्ति दूर व्हावी हाणून सायणभाष्यांतील सर्व महत्त्वाचा मजकूर घेऊन, अवश्य वाटलें तेथें मराठी अर्थ देऊन व छापण्याच्या एका विशिष्ट रीतीचा अंगीकार करून सायणभाष्य, त्या पुस्तकात, सुबोध केलेले आहे. "तत्त्वविवेचक" प्रथप्रसारक मंडळीकरितां कै. तुxxxxx व आत्माराम कान्होबा ह्यांनी सभाष्य