पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इश्वरकृपेनें ती भीति आतां उत्तरोत्तर कमी होत चालली आहे त्याबद्दल आपण त्या यूरोपिअन् लोकांचे व त्यांत विशेषतः जर्मन् पंडितांचे आभार मानले पाहिजेत. तथापि वेदांचा अर्थ करण्याच्या रीतीसंबंधाने त्यांचा व आपला मतभेद फार आहे ही गोष्ट मात्र अगदी खोटी नाहीं. त्याविषयींचें विवेचन दुसरीकडे केलेच आहे, तरी त्यासंबंधानें कै. शंकर पांडुरंग पंडित यांनी प्रदर्शित केलेले मत येथें दाखल करतों.-"माझा स्वताहाचा तर अनुभव असा आहे कीं वेदाच्या अभ्यासाला जी साधनें आह्मां हिंदु लोकांस आहेत, आणि त्याचा खरा अर्थ आह्मांस समजण्याचा एकंदरीत जेवढा संभव आहे, त्यापेक्षां पाश्चात्यांस साधनेंही थोडीं आणि समजण्याचा संभवही थोडा. या विषयीं मी आजपर्यंत वेदासंबंधाचे पाश्चात्यांनी केलेले ग्रंथ जे जे पाहिले, आणि त्यांच्याशीं आमच्या लोकांचे ताडून पाहिले, त्यावरून खात्री होण्यासारखी आहे. याचे मुख्य कारण असें आहे कीं, हिंदु लोक जसे काय वेदाच्या माहेरींच असल्यामुळे बहुतेक ठिकाणी पाश्चात्यांस अत्यंत अडचणीअंतीं समजण्यास कठिण अशा ऋचा आमच्या लोकांस सहज समजण्यासारख्या असतात. कारण प्राचीन आर्य हिंदु आणि अर्वाचीन आर्य हिंदु यांजमध्ये मोठेंच अंतर पडलें आहे असें नाहीं. आणि आह्मांमध्ये आणि पाश्चात्यांमध्ये तर सर्व गोष्टींनी मोठेंच अंतर आहे. यास्तव पाश्चात्य विद्वान पश्चिमेतच राहून आपल्या मोठ्या उद्योगाच्या आणि अभ्यासाच्या योगानें वेदार्थसंपादनाविषयीं जरी शोध लावून मोठे अत्यंत उपयोगी ग्रंथ लिहितात, आणि आह्मांस त्यांचा उपयोग जरी मोठा होतो; तथापि वेद आमचाच आहे ह्या नात्यानेंच नव्हे, पण आह्मी वेदाच्या या आर्यभूमीत त्याजबरोबर राहिलो आहों या सहवासाच्या आणि साहचर्याच्या नात्यानें पाश्चात्यांप्रमाणे आह्मीं श्रम केले तर आह्यांला जशी वेदार्थाची प्राप्ति होण्याचा संभव आहे, तशी आमच्या पाश्चात्य विद्वान बंधूंना नाहीं असें आह्मी नम्रपणाने ह्मणण्याची परवानगी घेतों." कै. पंडितांसारख्या विद्वानाचे हे शब्द आहेत हे वरील उतारा वाचतांना लक्षांत ठेवावें.