पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व संधी, योजना या राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असल्याने घटनात्मक तरतुदींच्या परिघाबाहेरील अल्पसंख्याक असंघटित, अराजकीय राहिल्याने ते अदखलपात्रच राहिले आहेत.
 ‘सामाजिक न्याय' या संकल्पनेचा प्रारंभच मुळी वंचितांच्या मानवाधिकारांना मान्यता देण्याच्या गरजेतून झाला आहे, हे आपणास विसरता येणार नाही. सामाजिक न्यायाची कल्पना जगभर ज्या स्वरूपात अमलात आली आहे, ती जात, धर्म, वंश, वर्ण, भाषा, लिंग, प्रांत, राजकीय विचारप्रणाली यांचा विचार न करता, पूर्वग्रहमुक्त पद्धतीने केवळ ‘वंचितता' या एकमेव निकषावर उभी आहे. तिची व्याख्या पाहताना ते लक्षात आल्यावाचून राहत नाही. "The fair and proper administration of law conforming to the natural law that all persons irrespective of ethnic origin, gender, passions, race, religion etc. are to be treated equally and without prejudice." Aldis 'without prejudice' हा अत्यंत महत्त्वाचा शब्द असून, त्याकडे आपले दुर्लक्ष झाल्याने समाजपरिघाबाहेरील जो वंचित अल्पसंख्याक समाजवर्ग आहे, त्याचे प्रश्न आज ऐरणीवर आले आहेत.

 वंचित बालकांचा जो अल्पसंख्याक गट आहे, त्यात अनाथ, निराधार, हरवलेली, रस्त्यांवरील, भिक्षेकरी, बालगुन्हेगार, बालमजूर, स्थलांतरित, उपेक्षित, अनैतिक व्यापारात गुंतलेली, शारीरिक व मानसिक दुर्बल, विकलांग, संकटग्रस्त, वेश्या, कुष्ठपीडित, कैदी यांची अपत्ये, विस्थापित मुले, विकारग्रस्त बालके, निवासी संस्थांतील निराधार मुले, विधिसंघर्षग्रस्त अपत्ये या सर्व संवगांत कमी-अधिक संख्या असली, समाजातील एकूण मुलांच्या संख्येत ही मुले अल्पसंख्याक ठरत, वाटत असली तरी त्यांची संख्या लाखांच्या घरात आहे, हे आपणास विसरून चालणार नाही. त्यांचे प्रश्न जीवअस्तित्व टिकविण्यापासून सुरू होतात. संगोपन, सांभाळ, आहार, आरोग्य, उपचार, शिक्षण, संस्कार, पालकत्व, प्रशिक्षण, नोकरी, विवाह, निवारा, पुनर्वसन इत्यादी त्यांचे प्रश्न जात, धर्माधारित अल्पसंख्याकांपेक्षा गंभीर असून ते प्राधान्यक्रमाने राष्ट्रीय, बनण्याचे आहेत. यातील वंचित मुलींचे प्रश्न म्हणजे ‘रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रश्न' असेच आहेत. त्यात कसलीही अतिशयोक्ती नाही. जिज्ञासूंनी या संदर्भात या लेखकाची ‘खाली जमीन, वर आकाश', ‘आत्मस्वर', 'दुःखहरण', 'निराळं जग, निराळी माणसं', 'महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा',

सामाजिक विकासवेध/९५