पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण तिच्यातलं वाचन सुखकर खरं. खरं वाचावं, लिहावं असं वाटलं ते टेबललॅम्पमुळे. कॉलेजच्या जीवनात टेबललॅम्प आले आणि शिक्षणास तपस्या करून गेले. टेबल, खुर्ची व लँम्प म्हणजे आधुनिक शिक्षण, वाचन, लेखन होऊन गेलं. गरीबघरी बल्बवर कागद लावून घरगुती टेबल लॅम्प बनविले जात. त्या प्रतिकूल परिस्थितीत लेखन, वाचनाची जिद्द म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होणं वाटायचं. ते तर रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून वाचीत. आत्ताच्या पिढीत एलईडी लॅम्प आले; पण लेखन, वाचनाची ती समाधी, तपस्या, जिद्द अपवादाने दिसते. सुखासीनता समाधीविरोधी असते तशी संघर्षविरोधीही ! परिस्थितीचा काच, ओढग्रस्तता माणसास कष्टी, काटकसरी, काटक बनविते. हॅलोजननी डोळे दिपतात, दिव्यांनी ज्ञानाचा दिवा घरोघरी लागतो.
सावध ऐकणं
 ‘सावध ऐका पुढल्या हाका' नावाची एक काव्यपंक्ती आहे. लहानपणी कोणत्यातरी कवितेतली ही ओळ अभ्यासलेली... ती अजून माझा पाठलाग करते आहे. हाका घालते... सावध करते... बजावते... बजाऽऽव... सांगते ऐका ऽऽ ऐकणं हा आमच्या पिढीवरचा एक मोठा प्रभावकारी संस्कार होता. घरी आई-वडिलांचं, थोरामोठ्यांचं ऐकायचं म्हणजे ऐकायचंच. घरोघरी मिलिटरीच होती. There is no question why ? But to do and die. असाच सारा माहौल असायचा. शाळेत गुरुजी म्हणतील ती पूर्व दिशा. ‘शिवाजी म्हणतो'चा खेळ ! गुरुजी दैवत होतं. त्यांनी सांगितलेलं कान भरून ऐकायचं. मनात साठवायचं. आयुष्यभर ते ऐकलेलं पुरायचं... पाठलाग करीत राहायचं गुरुर्रब्रह्मा, गुरुर्रविष्णू, गुरदेवो महेश्वरा... डोळे मिटून, हात जोडून म्हटलेला श्लोक... डोळे उघडले प्रौढपणी; पण श्लोक मिटलेलाच राहायचा. ही सारी ऐकण्याची कमाल आणि किमया असायची.

 गाणी, भजन, प्रवचन, कीर्तन, भारूड, पोवाडे, हादग्याची गाणी, नागपंचमीची गाणी अन् सिनेमाची पण... सान्यांची गुणगुण प्रत्येकाच्या गळी, मनी-मानसी असायची. लहानपणी मूकपट असायचे. सिनेमाला आवाज नव्हता. सर्व अभिनयातून व्यक्त व्हायचं. म्हणून चॅर्ली चॅप्लिन, लॉरेल हार्डी मोठे कलावंत होते. मग आवाज आला, गती आली व गाणी पण. चित्रपटाच्या रेकॉर्डस - ग्रामोफोनचं केवढं कुतूहल व कौतुक होतं. हँडल, पिन अडकली की गाण्याची फजिती; पण ती गाणीच वाटायची. नूरजहाँ, बेगम अख्तर, नंतर लता मंगेशकर आली. क्लासिकल गाणी एकतारी पाक असायचा. डोळे मिटून ऐकणं म्हणजे मैफल असायची. एस्.

सामाजिक विकासवेध/६७