पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सावलीचं भूत व्हायचं केव्हा केव्हा! ते वाचणं म्हणजे अंगात येणंच असायचं. तरुण वयात रंभा, मेनका मासिकं, कोकशास्त्र, बर्म्युडा टॅगल कंदिलात वाचणं म्हणजे खरी आभासी संभोगसमाधी असायची. कूस, मांडी बदलत वाचणं, ताणतणाव शिथिल करणं असायचं. आता यांची जागा मोबाईल क्लिप्स, पोर्नोग्राफी साइटसूनी घेतली आहे खरी... तोही आभासच ! पण अधिक रोमँटिक, लाईट, व्हरायटीची रेलचेल!
 कंदील गेले अन् गॅसबत्त्या आल्या. गॅसबत्त्या पेटवणं म्हणजे दिव्य असायचं. त्यांचं लहरी भडकणं म्हणजे चक्कीत जाळ असायचा. ती पेटविणा-याच्या नाकदुन्या काढता काढता नाकी नऊ यायचे! त्यात मेंटल फुगा फुटला की सारं ओंफस व्हायचं. डोळे दिपणारा प्रकाश देणारी गॅसबत्ती प्रखर प्रकाशामुळे वाचायला कमी उपयोगाची ठरली; पण तिनं सभा, लग्नाच्या वराती, मांडव यांची शान वाढविली.
 मग आले विजेचे दिवे. बल्बला खेडोपाडी काचेचा गोळा म्हणत. विजेचं घर म्हणजे श्रीमंतीचं लक्षण असा एक काळ होता. रस्त्यावरचे दिवे, रेल्वे स्टेशन, स्टॅड, कमिटी रेल्वे गार्ड सर्वांच्या हाती-माथी रॉकेलचे दिवेच असत. त्या काळात विजेचं आगमन म्हणजे एका रात्रीत झालेली प्रकाशक्रांती, ज्ञानक्रांती ठरली. लख्ख प्रकाश रात्री दिसणं म्हणजे लोकांना रात्री सूर्य उगवल्यासारखं वाटू लागलं. छोटे-छोटे सूर्य रात्री घरोघरी तळपू लागले. आता पोतरलेल्या, सारवलेल्या भिंती माणसांना रंगवाव्याशा वाटू लागल्या. बिछाने धुवावेसे वाटू लागले. भांडी उजळावी वाटू लागली. तो बल्ब नामक काचगोळाही महाग वाटावा अशी घरोघरी गरिबी होती. विजेचा दाब अनियमित झाला की बल्ब जायचा, जळायचा म्हणजे बाद व्हायचा. त्यातलं फिलमेंट... तार जुळवत लोक बल्ब पेटविण्याचा किती प्रयत्न करायचे! नाइलाज झाला तरच नवा बल्ब, तोही १५, २५ वॅटचा. त्यात वाचायची, लिहायची गंमत म्हणजे ज्ञानाचा नवा अवतार. मग त्यावर हंड्या आल्या. प्रकाश आणखी वाढला; पण भाड्याच्या घरात राहणारे अधिक होते. या विजेने भाडी वाढविली. घरमालक म्हणजे वाचनशत्रू असायचा. तो ठरल्या वेळातच वीज सोडायचा. त्याच्या घरी मेनस्विच असायचं. परीक्षेच्या दिवसांत घरमालक कर्दनकाळ वाटायचा. रात्री १० वाजले की तो ब्लॅक आऊट करायचा. मग ठेवणीतील कंदील राखीव खेळाडूसारखा मदतीला यायचा. जुनं ते सोनं वाटायचं.

 पुढं ट्यूब आली आणि सोनेरी, पिवळा प्रकाश दुधी, आल्हाददायक झाला; पण ट्यूब लहरी असायची. तिची वीजपेट म्हणजे लपंडाव होता;

सामाजिक विकासवेध/६६