पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंधार झाला हे खरं; तरीपण...


 काही वर्षांपूर्वी एका नियतकालिकाने एक चित्रमाला प्रकाशित केली होती. तिचं शीर्षक होतं - 'Ugly Indians' चित्रांतून दाखवलं होतं की भारतीय लघवी कशी करतात? (कुठेही, कशीही, आडोसा पुरे अन् कधी कधी तरी आडोशाशिवायही बिनदिक्कपणे!) कचरा कसा टाकतात? थुकतात कसे? सार्वजनिक ठिकाणी ओळीची शिस्त कसे पाळत नाहीत? वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर कसे बसतात? नद्यांचे प्रदूषण कसं झालंय? (नद्यांत प्रेतं तरंगतात), रस्ते सर्रास खाचखळग्यांनी कसे भरलेले असतात, सार्वजनिक प्रसाधनगृहे अस्वच्छ व दुर्गंधीने कशी भरलेली असतात... ही सारी दृश्यं शिसारी आणणारी होती. खरं तर तो आपल्या सार्वजनिक चारित्र्याचा आरसाच होता.
 मी अनेकदा, अनेक देशांना सामाजिक कामाच्या निमित्ताने जाऊन आलो. परतीच्या क्षणी, भारतात पाय ठेवल्यावर एक जाणीव प्रकर्षाने होते की, आपण गर्दीत राहतो नि घाणीत. विदेशात गेले की भारतीय शिस्त, स्वच्छता, ओळ, नियम सारं पाळतात. भारतात आले की 'येरे माझ्या मागल्या...' आपलं असं का होतं? विचार करताना लक्षात येतं की, खोट आपल्या माणूस घडणीत आहे. आपण माणूस ‘शिक्षित करतो, ‘नागरिक नाही बनवत. नागरिक म्हणजे जबाबदार नागरिक !

 जबाबदार नागरिक घडवणं काय असतं त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. सन १९९० मध्ये मी फ्रान्सला गेलो होतो. एका मतिमंद मुलांच्या शाळेस मी भेट दिली होती. भेट अचानक दिली होती. तसा तिथे अचानक भेट देण्याचा प्रघात नाही. मी गेलो तेव्हा बाई वर्ग तयार करीत होत्या. म्हणजे कागद, कपटे सर्वत्र टाकत होत्या. मी न राहवून त्यांना विचारलं की, “तुम्ही काय करत आहात?' त्या उत्तरल्या की, 'मी शिकवण्यासाठी वर्ग तयार करत आहे. मला काहीच कळलं नाही. मी परत विचारलं की, “काय

सामाजिक विकासवेध/५५