पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिकवणार आहात?' त्या म्हणाल्या, ‘स्वच्छता.' मी चकितच झालो. त्यांना स्वच्छता शिकविण्यासाठी वर्ग घाण करायला लागला. आपणाकडे तो मुळात घाणच असतो (बहुधा). खरी गंमत पुढे आहे. आमची ही प्रश्नोत्तरे चालली होती, तेवढ्यात दुस-या शिक्षिका वर्गात मुलं घेऊन आल्या. बाईंनी मुलांना प्रत्येकी एक-एक चॉकलेट खायला दिलं. खायला सांगितलं. मुलांनी मिटक्या मारत खाल्लं. बाईंनी चॉकलेट संपल्यावर विचारलं, 'चॉकलेट संपलं, उरलं काय?' मुलांनी उत्तर दिलं, 'वेष्टण (रॉपर), ‘त्याचं काय करणार? मुलं एकमेकांकडे, बाईंकडे हलत, डुलत, लाजत बघत होती. बाईंनी समजावलं. राहिलं ते टाकाऊ, ते टाकायचं कचरा कुंडीत. सर्वांना वेष्टनं कचरा कुंडीत टाकायला लावली. मग वर्गातील इतर घाण गोळा करून ती कचरा कुंडीत टाकायला लावली. पुढे त्यांनी मुलांना जे सांगितलं ते मला महत्त्वाचं वाटलं. त्या सांगत होत्या, ‘कचरा करून मग तो गोळा करून स्वच्छता करण्यात काहीच शहाणपण नाही. कचरा न करणं म्हणजे स्वच्छता.' ही व्याख्या, ही शिकवण मी तिथे पहिल्यांदा ऐकली, पाहिली आणि मग मला युरोपच्या स्वच्छतेचं रहस्य उमगलं आणि आपल्या गांधीजयंतीचं वैयर्थही !

 माणूस असण्याची खरी कसोटी त्याचं सामाजिक असणं होय. निसर्गात मुंग्या, मधमाश्या, माकडांच्या झुंडी, पुंजक्यानं असतात. पैकी मुंग्या नि मधमाश्यांमध्ये शिस्त व सामाजिकता असते. अपवाद असतात माकडं. आपल्यात शिस्त व संयम नसण्याचं एक कारण आनुवंशिकता आहे; पण जगातील प्रगल्भ समाज जबाबदार नागरिक व समाज घडवतात, त्याची सुरुवात त्यांच्या घरापासून होते. तिथे घरी मुलांचं स्वावलंबन पहिल्या दिवसापासून सुरू होतं. तान्ह्या बाळाला आई कुशीत न झोपविता पाळण्यात झोपविते. मुलं मोठी होतील तशी ती सर्व कामे, अभ्यास स्वत:चा स्वतः कसा करतील हे पाहिलं जातं. घरात स्त्री-पुरुष भेद असत नाही. घरकामातही स्त्री-पुरुष विभागणी नाही. जेवल्यानंतर स्वत:चं ताट (प्लेट्स) स्वतः धुऊन, पुसून ठेवण्याचा प्रघात आहे. खरकटं टाकताना, कचरा टाकताना ओला, सुका वेगवेगळ्या कचराकुंडीत टाकला जातो. सारा कचरा पिशवीत बंद करून कचरा डेपोत टाकला जातो. कागद, पुस्तके, रद्दी, प्लास्टिक, काचसामान, अडगळीतल्या वस्तू टाकण्याचे दिवस ठरलेले असतात. अशा छोट्या-छोट्या व्यवस्थेतून तिथली सार्वजनिक शिस्त व जीवन आकारते. घरोघरी कामं स्वतः करण्याकडे कल आहे. त्यातून स्वावलंबन आकारतं.

सामाजिक विकासवेध/५६