पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 संशयावरून अलीकडेच वाचलेलं एक पुस्तक आठवलं. वारीस डीरी या सोमालियन मुस्लीम स्त्रीचं आत्मकथन ‘डेझर्ट फ्लॉवर'. निवडुंगाचं फूल. ती अवघ्या पाच वर्षांची असताना तिची सुंती केली होती. मी आजवर अशा समजुतीत होतो की, ती केवळ पुरुषाची असते; पण स्त्री सुंता हा सर्वांत जघन्य पुरुषी अत्याचार होय. सोमालिया, सुदान, इथियोपिया, इजिप्त, माली, जुबटी इ. देशातील ८० टक्के स्त्रियांची सुंता केली जाते. त्याशिवाय ती स्त्री पवित्र (हलाल) मानली जात नाही. सुंता म्हणजे स्त्रीच्या योनीचा उंचवटा छाटून योनिमुख शिवणे. केवळ लघवी वा मासिक स्राव जाण्यासाठी छिद्र ठेवणे. या अत्याचाराने पीडित वारीस डीरी स्वकर्तृत्वाने जगप्रसिद्ध मॉडेल बनते... आयुष्याच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यावर आपल्या अंतरंगाचं शल्य उघडं करते... लढा देते... अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, युनोसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना तिच्या पाठीशी उभारतात. ती युनो। अॅम्बॅसडर बनते... स्त्रीमुक्तीचे रणशिंग फुकते... धर्म, जातीच्या परंपरातून स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीचे स्वातंत्र्य, तिच्या अंतर्मनाचा, खासगी आयुष्याचा अधिकार म्हणजे जगणं ना ?
 भारतात अजून स्त्रियाच घसरतात. पुरुष असतात सहीसलामत. ही परंपरा दुष्यंत-शकुंतला, कुंती-सूर्य, विश्वामित्र-मेनका इतकी जुनी-पुराणी. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांना काही दिवसांपूर्वीच दहा लाखांचा दंड ठोठावला. का तर ते आपल्यापासून झालेल्या मुलाच्या । वैधतेसंबंधी खटल्यात हजर राहत नाहीत. डी. एन. ए. टेस्टचा शोध लागून दशक उलटून गेलं; पण आपणाकडे एकाही विश्वामित्राला अपराधी घोषित करण्यात आलेलं नाही, याला काय समान न्याय म्हणायचा? कुमारी मातेनंच, अनौरस अपत्यानंच वनवास का सोसायचा असा प्रश्न समाजाला का अस्वस्थ करीत नाही ?

 'स्त्रीचा सर्वठायी समान सन्मान' अशी सामाजिक स्थिती निर्माण करणं भारतीय समाजापुढचं खरं आव्हान आहे. ते वरवरची मलमपट्टी महिला आरक्षण, महिला राज, महिला सबलीकरण, महिला बचत गट अशा सवंग योजना वा घोषणांनी ना स्त्रीस्वतंत्र, स्वप्रज्ञ, स्वावलंबी होणार; ना मुक्त. स्त्रीस्वातंत्र्य हे कोणी देऊन येणार नाही. ते स्त्रीस स्वत:च मिळवावं लागेल. विकासात बाह्य प्रेरणा, प्रबोधने ही उत्प्रेरकासारखी उत्तेजक असतात. खरा विकास व्हायचा तर अंतर्भान महत्त्वाचं. ते शिक्षणापेक्षा शहाणपणातून यावं लागतं. शहाणपण ही स्वानुभवाची निर्मिती असते. ती स्वसंवादातून येते. तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचा. वाट शोधायची. स्वविवेकाच्या

सामाजिक विकासवेध/५३