पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आर्थिक सुविधा
 सिंगापूर काय पिकवितो, असं जर तुम्ही मला विचाराल तर हा देश पैसा पिकवितो. व्यापार, उद्योग व बँकिंग या तीन मार्गांनी सिंगापूरला पैसा मिळतो. बंदर, विमानतळ बारमाही गजबजलेलं असतं. ही मालाची उतारपेठ तशी माणसांची पण; पर्यटक इथे बारमाही येत-जात असतात. उद्योगात म्हणाल तर तेलशुद्धी, जहाजबांधणी असे खर्चिक उद्योग उभारल्याने मार्जिन ऑफ प्रॉफिट मोठे. इथे श्रीमंत कमी, नोकरदार जास्त. त्यामुळे पैशाचं चलनवलन वाहतं ठेवण्यासाठी यांनी बंदर करमुक्त ठेवलं व कर्जाला व्याज नामधारी म्हणजे केवळ १ टक्का आहे. त्यांच्या पैसा, श्रीमंती, गंगाजळीचं रहस्य ! सिंगापूरमधील सारे भारतीय तिथं एक टक्क्याने कर्ज घेऊन भारतात १० टक्के ते १८ टक्के किमान फायदा केवळ आर्थिक उलाढालीतून कमावतात, हे सांगून कुणाला खरं वाटणार नाही.
  सिंगापूरमध्ये आलेला विदेशी नागरिक व स्थानिक नागरिक यांत त्यांनी सोयी, सवलतींत फार अंतर ठेवलेलं नाही. तेथील विदेशी नागरिक विद्यार्थी, नोकरी परवानाधारक, अवलंबित पालक, कायम निवास परवानाधारक, हंगामी परवानाधारक असे असतात; पण तुम्हाला कायम परवाना मिळाला की तुम्हाला तिथल्या स्थानिकांच्या सर्व सुविधा, सोयी लागू होतात. त्यामुळे विदेशी नागरिकांचे सिंगापूरला स्थायिक व्हायचे प्रमाण जवळजवळ ४0 टक्क्यांपर्यंत जाते.

 सिंगापूरच्या आर्थिक विकासाची गोम तेथील राजकीय व संविधान पद्धतीत आहे. तिथे प्रजासत्ताक राज्यपद्धती आहे. लोकप्रतिनिधी, पंतप्रधान, राष्ट्रपती सरळ मतदानाने निवडले जातात. मतदान तिथे सक्तीचे आहे. दुर्धर आजारी अपवाद केले जातात. शिवाय तिथे सैन्यशिक्षण सक्तीचे आहे. सर्वसाधारण शिक्षणही इथे सक्तीचे आहे. त्यामुळे सर्वसाधारण नागरिक सुशिक्षित असतात, तसेच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. अवैध धंद्यांना प्रतिबंध असल्याने व्यसनांचा सुळसुळाट नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य व समाजसद्भाव दोन्हींचा विकास येथील लोकजीवनात आढळतो. उत्पन्नाच्या मानाने काटकसरीने राहणे इथल्या लोकांचा स्थायीभाव असल्याने कर्जबाजारी वृत्ती नाही. म्हणूनही देशाचा सतत अर्थोत्कर्ष पाहण्यास मिळतो. तिथली समृद्धी शासन योजना व लोकजीवन यांची ही संयुक्त फलनिष्पत्ती होय.

सामाजिक विकासवेध/३६