पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रेमाची सत्त्वपरीक्षा घेणार असाल तर तुमचे मिसकॉल तिला कळायला हवेत!

 असं यंदा कर्तव्य असणा-या सर्वांनी स्वत:ला एकदा उसवून, तपासून पाहायला हवं ! आपण एकविसाव्या शतकातील जागतिक ज्ञानसमाजाचे विश्व नागरिक होत आहोत तर विवाहाच्या कल्पना लोकल राहून चालणार नाहीत. मुलानं शिकून डॉलर कमावले पाहिजेत; पण बायको डोलीतलीच केली पाहिजे अशी विसंगत कल्पना कालबाह्यच ठरणार! मुला-मुलींचे मित्र, मार्गदर्शक बनणारे पालकच येथून पुढे सुखी उत्तरायण कंठू शकणार; अन्यथा वृद्धाश्रम ठरलेला! “तू नहीं तो और सही' म्हणत बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड बदलत राहायचा काळ गेला. निष्ठाच तुम्हास सुखी करील. निष्ठा म्हणजेच नैतिकता. ज्यांना विवाहामागचं कर्तव्य समजत नाही ते तोंडघशी पडतात. जे कर्तव्य निभावतात तेच ताठ मानेनं जगू शकतात. विवाह अपत्यसुखासाठी असतो खरा! पण कधी-कधी भांडं रिकामं निघतं. रुसू, रागावू नका. देवकी नाही, यशोदा बना. वासुदेव नाही बनायला जमलं, नंद बना. नंदनवन निर्माण करा! जीवन अमृतघटासारखं असतं. अमृतघट घरच्या प्रेमानेच भरतो. बाजारी वणवण फिरून तो भरता येत नाही. भरेल पण त्यात अमृत असणार नाही. भौतिक संपन्नता म्हणजे जीवन नव्हे. जीवन म्हणजे एकमेकाचं होणं, एकमेकाचं असणं, एकमेकांसाठी जगणं अन् मरणंही! जुने जाऊ द्या मरणालागुनी... ध्यास नव्याचा धरा! यंदा कर्तव्य असेल तर हे वाचा, विचार करा. पटलं तर कृती करा. अमृतघट भरून वाहत राहील.

सामाजिक विकासवेध/३१