पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उतरायलाच तयार नसतील तर अर्थस्वावलंबी व्हा. त्यांना खलील जिब्रानची ‘बालके' कविता वाचायला द्या. समजवा-
 मुलं तुमचीच आहेत
 ती तुमच्याच हाडामांसाची
 पण वेगळी मनं, स्वप्नं ल्यालेली
 त्यांना सर्व द्या फक्त तुमचे विचार नका देऊ
 कारण ती त्यांचे स्वत:चे' घेऊन
 जन्मलेली असतात.
  घरी यंदा कर्तव्य असेल तर पालकांनी मार्गदर्शक व्हावं. पाहावं खड्डयात तर उडी मारत नाही ना ? सरळ जात असतील तर गार्ड बनून ग्रीन सिग्नल द्या. गाडीला अपघात होईल असं वाटलं तर लाल झंडी दाखवा.आयसीयूमध्ये जाईपर्यंत बघे बनू नका. डिझास्टर मॅनेजर बनण्यापेक्षा डिझास्टर प्रिव्हेंटर, कंट्रोलर बना. हस्तक्षेपही जिम्मेदार हवा. ऐकलं तर ठीक... मला कपाळमोक्षच करून घ्यायचाय म्हटले तर तटस्थपणे शुभेच्छा द्या! प्रसंगी थर्ड अंपायर बना. जग काही म्हणो. आतला आवाज प्रमाण माना.

 मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लाईफ इज नॉट एंजॉयमेंट, इट्स ए एंगेजमेंट! विवाहापूर्वी एंगेजमेंट का असते ? अक्षतेपूर्वी ‘सावधानऽऽ' का असतं? तर तो वादळापूर्वीचा इशारा, बावटा असतो! क्षणभर थांबून, थबकून विचार करायचा असतो. मी कुणाची प्रतारणा तर करीत नाही ना ? मी नुसतं शरीर नाही, मनपण समर्पण करू शकते ना ? अलीकडे स्त्री-पुरुष समानता, स्वातंत्र्य, माध्यमप्रसार, जागतिकीकरण, नवतंत्रज्ञान यामुळे गात्रं लवकर ढिली पडू लागलीत. शरीरसुखाला विवाहाची पूर्वअट राहिली नाही. विवाहपूर्व गुंतवणूक कॉमन व्हायच्या काळात आपण कर्तव्य करीत असताना पुरुषांनी स्त्रीकडे, पत्नीकडे संशयानं पाहायचं, पहारा ठेवायचा व आपण मात्र कृष्ण, रावण बनत रोज नवं सीताहरण, वस्त्रहरणाची नाटकं खेळायची ... हा इकतर्फ गेम आता जमणार नाही. तुम्ही पाक-साफ असाल तर राम, सत्यवान असाल तर सीता, सावित्रीचा आग्रह धरायचा तुम्हाला नैतिक अधिकार! स्त्रीस एक व पुरुषास दुसरी मोजपट्टी चालणार नाही. बायकोचा मोबाईल पाहायचा असेल तर तुमचा फेसबुक अकाउंट पाहायचा अधिकार बायकोला दिला पाहिजे! प्रेयसीचा ई-मेल पासवर्ड मागून तिच्या

सामाजिक विकासवेध/३०