पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/174

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिसत नाही. कायद्याचे भय नि पोलिसांचा आदर आपल्या समाजात दिसत नाही. तो तिथे आढळतो. काय मजाल कोणी वेगमर्यादा ओलांडेल, झेब्रा क्रॉसमध्ये गाडी उभी करील, दुचाकीवर तिघे बसतील. आपणाकडे वाहतूक पोलिसांनी अडवले की शेंबडे पोर पण आधी इन्स्पेक्टर, डी. एस. पी., नगरसेवक, आमदार कुणाला तरी फोन लावून आपण केलेल्या कायदेभंगाच्या दंड व शिक्षेतून सूट, सवलत, माफीचा सर्रास प्रयत्न करते. ज्यांना तो फोन करतो, तो महाभाग पोलिसांचे न ऐकता त्यालाच सुनावत राहतो. कसे येणार आपल्या देशात कायद्याचे राज्य ?
 साधी गाडी पार्क करायची म्हटली तरी तिथले नागरिक किती विचार करतात, हे मी अनुभवले आहे. पार्किंगची परवानगी नसलेल्या जागी गाडी पार्क करणे म्हणजे आपण कायदा मोडतो आहोत, या जाणिवेने तिथले नागरिक किती अस्वस्थ, बेचैन असतात, हे मी अनेकदा अनुभवले आहे. नागरी जीवनात शिस्त, स्वच्छता, नियमपालन यांना असाधारण महत्त्व असते. असे पालन करणारा समाज प्रगल्भ मानला जातो. आपण उठताबसता जीवनमूल्यांबाबत बोलतो. आदर्शाच्या गप्पा मारतो; पण प्रत्यक्ष कृती करायचा प्रसंग येतो, तेव्हा मात्र आपण परिस्थितिशरण व्यवहार करतो. स्वच्छता हा आपल्या घरोघरी दिला जाणारा संस्कार, घर, अंगण स्वच्छ असते. मग रस्ते घाण, गटारी भरलेल्या, उकिरडे भरून वाहणारे, सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य असे का व्हावे ? तर आपण रोजच्या जीवनात सार्वजनिक जबाबदारी पाळणे गंभीरपणे घेत नाही, हे त्याचे खरे कारण होय. महात्मा गांधी, सेनापती बापट, साने गुरुजी, गाडगेबाबा आणि अगदी अलीकडे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वजण ‘स्वच्छता अभियान’, ‘सफाई। कार्यक्रम’, ‘श्रमशिबिर' अशा कितीतरी माध्यमांतून स्वच्छता संस्कार रुजवित आलेत. तरी त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही. आपण सत्तरएक गांधीजयंती सफाईवर समर्पित केल्यापण देशातील दुर्गंधी, उकिरडे, कचरा कोंडाळे कमी होत नाहीत. सार्वजनिक मुताच्या, प्रसाधने साफ असत नाहीत. बस स्टैंड, रेल्वे स्थानक, सार्वजनिक कार्यालये, जिन्यांचे कोपरे म्हणजे किळस केंद्रे. रस्ते अस्वच्छ नि खड्यांनी भरलेले. असे का व्हावे आपले ? मी विचार करतो तेव्हा लक्षात येते की स्वच्छतेची आपली कल्पना म्हणजे केलेली घाण दूर करणे. युरोपमध्ये असलेली स्वच्छतेची मूलभूत संकल्पना आपण भारतीयांनी एकदा समजून घ्यायला हवी.

 फ्रान्समध्ये मी मेझ (Metz) गावी आठवडाभर होतो. तिथल्या निवासकाळात मी तेथील अनाथालये, विद्यापीठ, वस्तुसंग्रहालय घरे पाहात

सामाजिक विकासवेध/१७३