पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जग तसे, आपण असे कसे ?

 वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या हेतूनी मी जगातील अनेक देश पाहिले. पैकी युरोप पाहिला तो १९९० मध्ये; म्हणजे त्यालाही पंचवीस वर्षे होऊन गेली. त्या वेळी मी फ्रान्स, इटली, इंग्लंड, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, बेल्जियम, जर्मनी, लक्झेम्बर्ग, व्हॅटिकन या देशांना भेटी दिल्या. मी भेटी देण्याच्या काळात पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी असे दोन स्वतंत्र देश होते. बर्लिनची भिंत पाडण्यात आली होती व जर्मन एकमेकांना पंचवीस वर्षांच्या ताटातुटीनंतर भेटत होते. पूर्व जर्मनी, जो रशियाच्या अधिपत्याखाली होता, पश्चिम जर्मनीच्या तुलनेने गरीब होता. पूर्व बर्लिनचे नागरिक पश्चिम बर्लिनमध्ये येऊन चॉकलेट्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत होते. त्यांची दुकाने रस्त्यांवर थाटलेली होती. बर्लिनची भिंत पूर्ण पडलेली नव्हती. माझ्यासारखे पर्यटक छन्नी, हातोडा भाड्याने घेऊन (तिथे त्यावेळी ते मिळत असे) भिंतीचे तुकडे करीत आणि आठवण म्हणून ते घेऊन येत असत. याच काळात मी फ्रान्समध्ये काही दिवस होतो. पॅरिसमध्ये एक संस्था आहे. ‘ला डिफेन्स' (The Defence) ती पॅरिसच्या नगर नियोजनाचे आराखडे तयार करीत होती. त्या संस्थेच्या आवारातही बर्लिनची भिंत पाडल्यानंतरचा एक मोठा अवशेष आणून प्रांगणात ऐतिहासिक आठवण व वारसा म्हणून ठेवण्यात आला होता.

 लक्झेम्बर्ग आणि व्हॅटिकन ही तशी दोन शहरे; पण त्यांना राष्ट्राचा दर्जा होता. सन १९९६ मध्ये व नंतर दोन-तीनदा मला सिंगापूरला जाण्याची संधी लाभली. तेही शहर पण राष्ट्र असलेले. या तीनही नगर राष्ट्रांमध्ये माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की, ही राष्ट्रे शिस्तबद्ध आहेत. कायद्याचे राज्य पदोपदी लक्षात येते. म्हणजे पोलीस, सैनिक दिसतात. ते दक्ष असतात. त्यांच्या असण्याची नागरिक दखल घेतात. आपल्याकडे पोलीस हा कायद्याचा रक्षक, पालक आहे, असे समाजमनावर बिंबलेले

सामाजिक विकासवेध/१७२