पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मला आठवतं की, सन १९९८-९९ च्या दरम्यान आम्ही ‘ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर' योजला होता. या मोर्चाचे नेतृत्व कैलास सत्यार्थी करीत होते. महाराष्ट्रात दोनच शहरांत हा मोर्चा आलेला होता. त्यांपैकी एक शहर होतं कोल्हापूर. सुमारे १००-१२५ मुक्त बालमजूर या मोर्चात सामील होते. ते जगातील अनेक देशांमधील होते. “बचपन बचाओ आंदोलन आम्ही काही मित्र महाराष्ट्रात चालवित असू. शासनाचे श्रम अधिकारी ढिम्म हलत नसत. त्यांना या प्रश्नाचं गांभीर्यच असायचं नाही. आज ‘अवनि' ते कार्य करते. दोन दशके उलटून गेली तरी बालकांप्रती, विशेषत: वंचित बालकांबद्दल आपला वार्षिक पुळका बालकदिनीच उफाळून येतो. ‘परत ये रे माझ्या मागल्या, ताक-कण्या चांगल्या' म्हणत आपण मुलांना विसरतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बालकांचा उल्लेख 'Father of Nation' असा करीत असायचे. ज्या देशातील बाल्यच उपेक्षित त्या देशातील पालक कसे समृद्ध असणार ? सुजाण पालकांचा देश बालक हक्क जागृत देश असतो, हे आपणास विसरून चालणार नाही.
 हा लेख लिहीत असताना उगीच मला माझे बालपण छळत होते. मीपण कधी काळी एक न उमललेली कळी होतो. नि:शब्द नि:श्वास घेऊन जगण्याचा विकल संघर्ष करीत होतो. माझ्यातील उपजत ऊर्जा व वेळोवेळी मला लाभलेलं संस्थात्मक पालकत्व (अनाथाश्रम, रिमांड होम, शाळा, कॉलेज, विद्यापीठ) त्यांनी मला सावरलं, शिकवलं व शहाणं केलं. अशी संधी फारच कमी वंचित मुला-मुलींना लाभते. लाभली जरी संधी तरी, तिचं सोनं करण्याचं उपजत शहाणपण सर्वांत असतं असं नाही; म्हणून समाजात एक प्रकारचं सुजाण सामाजिक आपत्ती निवारण व्यवस्थापन असण्याची गरज आहे. ते आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे वंचित बालकांचा सांभाळ करील. संस्था कोंडवाडे बनत असताना मी हे स्वप्नं पाहतो आहे, याचे भान मला नाही असे नाही; पण स्वप्नं पाहिल्याशिवाय सत्यसृष्टी आकाराला येत नसते, ही खूणगाठ आपण मनात बांधली तरच नि:शब्द नि:श्वास घेणा-या आजच्या कळ्या उमलून उद्याचे जाणीवजागृत पालक बनतील तर उद्या आज बालकांची गुलाम राजधानी असलेला हा देश समृद्ध बाल्य बहाल करणारा स्वर्ग बनायला वेळ लागणार नाही. या, आपण सर्व वंचित बालकांप्रती प्रतिबद्ध होऊ या, सक्रिय राहू या, संवेदनशील बनूया.



    सामाजिक विकासवेध/१४५