पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भावाला दादा म्हणून हाक मारलं जायचं. असंच स्त्रियांचा माई, आक्का, मावशी, मामी, आजीचा गोफ आपसूक गुंफला जायचा. हे फक्त हाक मारण्यापुरतं नव्हतं. एखाद्या ताईचं लग्न ठरलं तर आश्रमात तिचे केळवण व्हायचं. साखरपुडा व्हायचा. लग्न व्हायचं. सारं अगदी घरच्याप्रमाणे. इतकंच काय, डोहाळजेवण, ओटी भरणं, बारसं सारं व्हायचं.
 आश्रमातील मुलं मोठी झाली की मुलांच्या संस्थेत जायची; पण सणसुट्टीला येणं-जाणं राहायचं. यातून नात्याला बळकटी यायची. मी घरोघरी पाहतो. भाऊ एक, नाही तर दोन. मला अगणित, बहिणींचंही तसंच. मी पंढरपूरच्या अनाथाश्रमातून कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये आलो. इथे मला असंख्य मित्र मिळाले. मला आठवतं, मी पंढरपूरच्या बालकाश्रमात असताना आश्रमाबाहेरच्या शाळेत जाऊ लागलो. शाळेत जाण्यानं मला बाहेरचं जग कळलं. म्हणजे किती छोट्या-छोट्या गोष्टी कळू लागल्या म्हणून सांगू ? गाई, म्हशी दूध देतात ? कोंबड्या अंडे देतात हे कळणं मला 'ज्ञान' होतं. तसंच एक नवं 'ज्ञान' झालं, ते आपण अनाथ आहोत, आपणाला घर नाही, नातेवाईक नाहीत. आपण बाहेरच्या जगापेक्षा वेगळे आहोत. आपलं जग निराळं आहे-ही वेगवेगळ्या प्रसंगांतून, चिडवण्यातून, निरीक्षणातून होणारी जाणीव बालवयातील ‘फ्युचर शॉक्स' होते. वय वाढेल तसे एकटेपण वाढत होते नि नातेसंबंधांची पोकळी रुंदावत होती.

 कुमार, किशोरवय ओलांडून मी तारुण्यात पदार्पण केले नि माझी हुरहुर सुरू झाली. मी झुरू लागलो. लक्षात आलं, अनाथांनी प्रेम नसतं करायचं. स्वप्नं नसतात पाहायची. ही स्थिती माझीच नव्हती. माझ्याबरोबरच्या सर्वांची असायची. यातून एक प्रकारचं उसवलेपण, उद्ध्वस्तपण आम्ही अनुभवायचो. मी पदवीधर होऊन शिक्षक झालो. पुढे डॉक्टरेट होऊन प्राध्यापक, प्राचार्यही! जीवनाच्या चढत्या भाजणीत लग्न, मुलं, संसार होत मी सनाथ झालो. पत्नी आश्रमातली असल्याने संसार सुखाचा झाला; पण या काळात मी आमचं आश्रमियांचं जग विकसित होईल असे पाहत राहिलो. ज्या रिमांड होममध्ये होतो, तिथला सचिव झालो. ती संस्था ‘घर बनवली. त्याचा पुरस्कार म्हणून महाराष्ट्रातील सर्व अनाथाश्रम, रिमांड होमचा अध्यक्ष झालो. हे लौकिक यश होतं. मला खरा आनंद होता, तो संस्थांचं मी 'घर' करू शकलो. रिमांड होम्स त्या वेळी कोंडवाडे असायचे. मुलांना ढोरांची वागणूक मिळायची. किती योजना, उपक्रमांतून संस्थांमध्ये माणुसकीचे वारे वाहू दिले. ते अलौकिक आनंदाचे क्षण होते.

सामाजिक विकासवेध/१२३