पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाऊल ठेवलं तर माझं नाव बदल' असा पवित्रा.) नाती आपोआप मिळतात ना, तेव्हा असा अहंकार आपसूक येतो. तुम्हाला अलगद लाभलेली नाती मला न मिळाल्याचा विषाद बालपणापासून तारुण्यापर्यंत माझा पिच्छा पुरवित राहिला होता. समज आली तशी मी नाती विणत गेलो. आज डोलखुर्चीवर बसून बंगल्याच्या कॉरिडॉरमध्ये वृत्तपत्रे चाळत मी गतायुष्य आठवत राहतो तेव्हा वाटतं, नाती लादलेली नसावीत. असावीत तर जोडलेली, मानलेली, जिवाभावाची! औपचारिक नाती मृगजळ असतं. स्वत:ची नि दुस-याची फसवणूक करणारं आणि खरं तर जीवनाची फसगत करणारंसुद्धा.
 मला रक्तसंबंध असे लाभलेच नाहीत. कुमारी मातेच्या पोटी जन्मल्याने जन्म देताच आई अनाथाश्रमातून परागंदा झाली. वडील आधीच विश्वामित्री पवित्रा घेऊन भूमिगत झाले होते. मग हे निश्चित होतं की, आई म्हणणारी कुणाची तर पत्नी झाली असणार नि वडिल कुणाचे तरी पती. त्यांना समाजमान्यता, उजळ त्यांचा माथा. अपत्याने मात्र आयुष्यभर वनवास सोसायचा. याला का नैतिकता म्हणायची? समाज ज्या नैतिक अट्टहासाने मुला-मुलींना अनाथ, अनौरस करतो, यात कसलं समाजस्वास्थ्य? कसला सामाजिक न्याय? जन्मदाती आई मला सोडून गेली नि दुस-या एका परित्यक्त मातेनं मला पोटाशी घेऊन वाढवलं. नाती सापेक्ष असतात. प्रत्येक वेळी जन्मदात्री श्रेष्ठ असते असे नाही. मला सांभाळणारी आई। लाख मोलाची वाटते; कारण पदरी पोलिओग्रस्त गोळा असताना मोठ्या धीरानं तिनं माझा सांभाळ केला. माझ्यासाठी तर ती जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेक्टची माता धीराईच ! (Mother of Courage)

 माझा आश्रम चांगलं तीनशे-साडेतीनशे माणसांचं महाकुटुंब होतं. एक दिवसाच्या बाळापासून ते शंभर वर्षांपर्यंतच्या आजीपर्यंत तिथले सगळे समाजाने नाकारलेले होते. अनाथ, अनौरस, चुकलेली, सोडलेली, टाकलेली मुलं, मुली. घराच्या जाचाला कंटाळून पळून आलेल्या मुली, बलात्कारित भगिनी, घरीच फसलेल्या कुमारी माता, पाय घसरलेल्या परत्यक्ता, विधवा, किती प्रकार सांगू?... पण यांना अपराधी करणारे सारे समाजात संभावित म्हणून जगत होते. शिक्षा फक्त आबाल-अबलांनाच ! समाजाने नाकारलेल्या या माणसांनी मग आपसांत मानलेली नाती निर्माण केली. म्हणजे असे की दिवाळीत भाऊबीज आली की, आश्रमातील सर्व मुली मुलांना ओवाळायच्या. रक्षाबंधनाला राख्या बांधायच्या. अशातून संस्थेतील मुलं-मुली एकमेकाची भाऊ-बहीण झाली. मग मोठी बहीण असेल तर ती ताई व्हायची. मोठ्या

समाजिक विकासवेध/१२२