पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कोल्हापुरात मी स्थायिक झालो. तिथे पाच-सहा पंढरपूरच्या आश्रमातील मुली लग्न करून आलेल्या. मी शिकत असतानाच्या काळात त्यांनी आम्हाला मोठा आधार दिला. तो काळ चहा देणारा देव वाटण्याचा होता. अशा काळात सण-समारंभाला या सर्व ताया पुरणपोळी खाऊ घालायच्या. त्या फार मोठ्या श्रीमंत नव्हत्या. आश्रमातील मुलांना काय नि मुलींना काय जी स्थळे मिळतात ती हातावरचं पोट असलेली. टर्नर, फिटर, वेल्डर, मिलिटरी मॅन, मुलांना नॉन-मॅट्रिक मुलगी मिळणं लॉटरी होती. ती मला लागली. मुलांचा विकासाचा परमोत्कर्ष म्हणजे आयटीआय. मुलीचं लग्न होणं हाच उद्धार. आमच्या सर्वांच्याच मी अधिक शिकलो. त्यामुळे मी या सर्वांचा अघोषित कुटुंबप्रमुख झालो. वय लहान, पण जबाबदारी महान. माझी मुलं शाळेत जाऊ लागली तेव्हा आमच्या ताई, दादांची मुलं कॉलेजच्या वयाची होऊ लागली. मला आठवतं, सर्व घरात पहिलं पाटी-पुस्तक मी आणत गेलो. त्याचा परिणाम असा झाला की, सर्व ताई, दादांची मुलं-मुली पदवीधर झाली. पुढे नोक-या, लग्न सर्व पातळ्यांवर विणलेले नातेसंबंध आता मानलेले असले तरी त्याला रक्तसंबंधांपेक्षा मजबुती आलेली मी पाहिली. सर्वांची स्वत:ची घरं, मुला, मुलींना समाजातील स्थळं यातून आम्ही समाजाचे अंग झालो यांचा आज मागे वळून पाहताना कोण आनंद, अभिमान वाटतो? आरक्षण, शिष्यवृत्ती अशी कोणतीच कवचकुंडलं या मुलांना, मुलींना लाभली नाहीत; पण तरी त्यांचं स्वावलंबी, स्वाभिमानी होणं ही मानलेल्या नात्यानं पुढं केलेल्या हाताची किमया होती.

 सर्व ताई-दादांची मुलं डॉक्टर, इंजिनिअर, पदवीधर, नोकरदार, कोणी व्यावसायिक प्रत्येकाची कथा म्हणजे नव्या नात्याचा चैतन्य अध्याय. समाजात मी जेव्हा रक्तसंबंधी नातेवाइकांमधील औपचारिक व्यवहार पाहतो, तेव्हा आमच्या मानलेल्या नातेसंबंधातील आपलेपण कितीतरी उजवं वाटतं. मी कॉलेज शिकत असताना मला किरकोळ खर्चासाठी दर महिन्याला दहा रुपये लागायचे. आमच्या आश्रमातील विकासदादा मुंबईत नोकरी करायचा. त्याला पन्नास रुपये मिळायचे. त्या वेळी तो मला दहा रुपयाची मनी ऑर्डर नित्यनियमाने करायचा. उतराई म्हणून मी आमच्या कुटुंबातील किती मुला-मुलींना मदत केली त्यापेक्षा शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य असताना अनेक गरीब विद्यार्थी, विद्यार्थिनींना केलेले साहाय्य मला अधिक महत्त्वाचे वाटते. आप्त-स्वकियांना केलेले साहाय्य आपले कर्तव्य असते; पण आपलं कोणीच नसलेल्यांना केलेली मदत तुमच्या माणूसपणाची कसोटी असते. नातेसंबंध म्हणजे देणं, घेणं, करणं नसतं, ‘होणं' महत्त्वाचं.

सामाजिक विकासवेध/१२४