पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हास्य मानवी मनाचं प्रतिबिंब असतं. हसरा चेहरा, बोलके डोळे, जुलमी नेत्र हे नुसते शब्द वाचले आणि विचार करीत जाल तर हास्य किती गहिरं असतं हे तुमच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. हास्य सार्वकालिक असतं तसं ते सार्वत्रिकही. Laughing Buddha किती जुना! चर्चिल, चॅप्लिन, येल्सीन तितकेच हसविणारे! हास्याची नजाकत असते तसं नुक्कड हास्यही असतंच. हास्य आम असतं आणि खासही! ते संसर्गजन्य असतं हे Laughter show मध्येच लक्षात येतं असं नाही, तर गप्पांच्या फडात आणि मित्रांच्या मैफलीतही लक्षात येतं.
 हास्य मानवी भावभावनांचं निदर्शक असतं तसं नियंत्रकही! हास्याच्या परिणामांचा अभ्यास करणारी मानसशास्त्र, शरीरशास्त्र या तर शाखा आहेतच पण केवळ हास्य परिणामांवर उभं आहे Gelotology. मूक, बधिर, अंध, अपंग, मतिमंद साच्यांत हास्य उपजत असतं.
 खरं हास्य निरागस, निष्पाप बाळाचं. ते नैसर्गिक खरं ! माणूस वाढतो मुळात हास्याच्या विरोधात. म्हणजे तो जेव्हा जगस्पर्शी, संसर्गी नसतो, जीवनाच्या कोणत्याच छटा, कळांची मोहर त्यावर उठलेली नसते तेव्हा सुरकुतीमुक्त, सुतकमुक्त हास्य बाळाचं बाळ दिवसाकाठी किती वेळा हसतं. म्हणे तीन-चारशे वेळा हो! आणि माणूस (थोराड) फक्त पंधरा, सोळा वेळाच. आता तुमच्या लक्षात येईल की, माणसाचं सारं जगणं हास्यविरोधी असतं असं मी का म्हणतो ते! संस्कार म्हणजे निसर्गनिरोध! मुलांना शिकवलं जातं... फिदी फिदी हसू नये, दात काढून हसू नये, गालातल्या गालात हसावं, मुलीच्या जातीनं चार-चौघांत हसू नये... म्हणजे नैसर्गिक वागू नये. इथेच जीवनातील एक-एक हास्य लकीर माणूस गमावतो व एकेक हस्तरेषा (Life print) कमावतो.

 बाळ घर ओलांडू लागलं की त्याला आपण बागूलबुवा दाखवितो. भय माणसात उपजत नसतं. ते मनुष्यनिर्मित असतं. काहीएक प्रमाणात ते अनुभवजन्यही असतं; पण भय हसण्याचा मृत्यू घडविते ... किमानपक्षी आत्महत्या तरी ! भावानुभव ही देण्याची गोष्ट नाही. ती जाणीव आहे. ती घेत, घेत विकसित होते. पोलीस, दाढीवाला, राक्षस, वेडा, कैकेयी, हॅम्लेट, कब्ज़ी ही भयचरित्रे मनुष्यनिर्मित. खुललेली कळी, स्मितहास्य, बोलके, हसरे डोळे निसर्गाचे वरदान! हा फरक एकदा का आपण समजून घेऊ लागलो की हास्याची किंमत कळू लागते. हास्य उपजत असतं. ते उसनं आणता येत नाही. कर्जाऊपण नाही मिळत ते बाजारात. घरचं बेणं विकायचं नि बी. टी. बेणं आणून पेरायचं यात जो अव्यवहार्यपणा आहे

सामाजिक विकासवेध/१०५