पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हसा, हसवा, हसत रहा !


 'The human race has only one really effective weapon and that is laughter' असं मार्क ट्वेनचं एक निरीक्षण नोंदविणारं विधान आहे. हे विधान माणसाचं व्यवच्छेदकपण अधोरेखित करतं. हास्य ही मानवी जीवनातील आनंदाची प्रगट अभिव्यक्ती म्हणायला हवी. हास्य, आनंद, हर्षातिरेक, ब्रह्मानंदाचा शरीरी उद्गार म्हणायला हवा. मानवी हास्याच्या अनेक छटा आढळतात. सहज, उत्स्फूर्त, प्रतिक्रियात्मक, प्रतिसादात्मक, रहस्यगर्भ, छद्मी, उपहासात्मक, संकेतात्मक इत्यादी. हास्यात आवेग, नाद, ताल, संगीत, रस, लय सारं भरलेलं असतं. म्हणून ते मोहक, आकर्षक, आल्हाददायी असतं. हास्य हा मानवी वर्तनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणून तो केवळ आविष्कार राहत नाही; तर त्यात उपचार सामर्थ्यही येतं. म्हणून अलीकडच्या काळात रोगोपचार, मानसोपचार जीवनकला म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. हास्य व्यक्तिगत असतं तसं ते सामूहिक असतं. त्याचं सामर्थ्य इतकं की ते युद्धाची स्थिती बदलतं. सामन्याची रंगत बदलण्याचं सामर्थ्य त्यात असतं. तसंच दु:खावर फुकर, विषाचा निरास म्हणूनही हास्याचं महत्त्व आहे. हास्य जगण्याची उमेद वाढविणारं उत्प्रेरक आहे. ते कधी लज्जा उत्पन्न करतं, तर कधी तुमची उपजत प्रवृत्ती समूळ बदलून टाकतं. ते कथा, काळ, विचार, विसंगती, टीकेचं माध्यम, साधन बनतं, तर कधी ते जीवनाचं साध्य बनून राहतं. खेद, उपहास, शल्य, सूचक हास्यातून जितकं प्रभावीपण व्यक्त होतं, त्याला पर्यायच नसतो. Million Doller Smile पाहायचं तर निरागस बाळाचं. त्यात किती बळ असतं म्हणून सांगू? ते पाहण्या- अनुभवण्यासाठी सारं आयुष्य पणाला लावताना मी पहिलं आहे आणि आयुष्याच्या अंतापर्यंत त्या सुवर्णक्षणाची प्रतीक्षा करतानाही!

सामाजिक विकासवेध/१०४