पान:साथ (Sath).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिला तीव्रतेनं आठवण होत होती. सुरुवातीला ती आणि राम गुलमोहोरसारख्या होटेलात राहात असत आणि त्याची त्यांना काही क्षिती वाटत नसे. पुढे पैसा पुष्कळ मिळायला लागल्यावर राम म्हणे, " सगळ्यात उत्तम होटेलात राहण्याची ऐपत असताना कमी दर्जाचं का पत्करायचं ? "
 ज्योतीला आपण समाजाच्या ज्या थरातून आलो त्याच्याशी प्रतारणा केल्यासारखं वाटायचं. आत्ता ती रामच्या म्हणण्याला आव्हान म्हणून मुद्दाम गुलमोहोरमधे रहायला आली होती, आणि त्याचा पश्चात्ताप होतो म्हणून तिचं मन तिला खात होतं. हा त्या दोघांमधला फरक तिला पहिल्यापासूनच जाणवला होता पण आता तिला आठवण झाली प्रतापला घेऊन ती बाळंतपणानंतर शिरगावला परत आली त्या दिवसाची.
 खरं म्हणजे बाळंतपणासाठी पुण्याला जायची तिची मुळीच इच्छा नव्हती, पण रामनेच आग्रह धरला म्हणून तिनं जायचं ठरवलं. तो म्हणाला शिरगाव खेडं आहे, तिथे चांगले डॉक्टर, सुसज्ज हॉस्पिटल अशा काही सोयी नाहीत. त्याची आत्या म्हणत होती की बाळंतपणाचं ते काय करायचं असतं ? मी घरीसुद्धा करीन. पण राम म्हणाला आयत्या वेळी काय होईल सांगता येत नाही. काही इमर्जन्सी आलीच तर जिथे त्याच्याबद्दल काही करता येईल अशाच ठिकाणी असलेलं बरं.
 मग तिला आईकडे सोडून परत जाताना तो म्हणाला, “ मला तुझ्याशिवाय फार एकटं वाटेल ग. इतके दिवस मी कसे काढणार आहे कुणाला ठाऊक. आत्याबाईंचं ऐकून तुला तिथेच ठेवलं असतं तर बरं झालं असतं."
 " मग चल येते मी तुझ्याबरोबर परत."
 " छे:, त्याबद्दल बोलूच नको. तुझ्या दृष्टीनं तू इथे राहणंच चांगलं. तुला तिकडे नेलं न् काहीतरी बरंवाईट झालं तर मी जन्मभर स्वतःला दोष देत राहीन. बरंय, मी येतो. काळजी घे. आणि मला रोज पत्र लिही."
 ज्योती हसायला लागली. “ रोज काय राम ?"

८२: साथ