पान:साथ (Sath).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 " मग एक दिवसाआड.” .
 आई कशी असेल, कशी वागेल याची ज्योतीला जरा धाकधूक वाटत होती. पण आईला नेहमीप्रमाणे कामाच्या गडबडीत असलेली, मोजून - मापून आणि जरा कोरडेपणानेच बोलणारी अशी पाहून तिच्या मनावरचा ताण नाहीसा झाला. आई आपल्या नवऱ्याबद्दलही काही विशेष बोलत नव्हती. एकदाच फक्त म्हणाली, " ते गेले तेव्हा तुला दिवस गेले असले पाहिजेत, ना ? आता मुलगा झाला तर त्यांचं नाव ठेव." ज्योतीचा आपल्या मुलाचं सदाशिव नाव ठेवण्याचा काही इरादा नव्हता, पण आत्ता त्याबद्दल वाद कशाला म्हणून ती गप्प बसली.
 आपल्या आईबापांमधलं नातं नक्की काय होतं याबद्दल ती बरेचदा विचार करायची. त्यांच्यासाठी एवढा शोक किंवा शोकाचं प्रदर्शन केल्यावर आता काही महिन्यांतच तिनं त्यांचं अस्तित्व पुसून टाकलं होतं. याबद्दल आईशी बोलण्याचं धाडस काही तिच्यात नव्हतं. एखादा अधिक - उणा शब्द तोंडून निघाला तर आई संतापायची. त्यातून ती खरंखरं काय ते बोलेल अशी शक्यता नव्हतीच. तशी ज्योती नि तिची आई यांच्यात खास अशी जवळीक कधीच नव्हती. आणि आता वडील गेल्यापासून आणखी दुरावा निर्माण झाला होता. वडील गेले तेव्हा ज्योतीला दिसून आलं होतं की आईच्या आपल्या स्वतःबद्दलच्या, स्वतःच्या इतरांशी - विशेषतः नवऱ्याशी - नात्याबद्दलच्या काही कल्पना होत्या. त्या सत्यपरिस्थितीशी सुसंगत होत्या की नव्हत्या हा प्रश्न नव्हता. तिला आत्मसन्मानाने जगण्याची उभारी मिळण्यासाठी त्यांची गरज होती, आणि ती त्यांना घट्ट धरून बसणार होती. खाजगीत सुद्धा त्यांना धक्का लागेल असं बोलणं - वागणं तिच्याकडून अपेक्षितच नव्हतं.
 आईच्या बाबतीत हे असं, तर बहीणभावाशी अगदी संबंधच तुटल्यासारखं ज्योतीला वाटलं. संजयने बी. एस्. सी. पूर्ण करून कॉलेज आणि संशोधन संस्थांना प्रयोगशाळांसाठी उपकरणं आणि रसायनं यांचा पुरवठा करणान्या एका कंपनीत नोकरी धरली

साथ : ८३