Jump to content

पान:साथ (Sath).pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ज्योतीजवळ कुरकूर करायचा. त्याला सगळ्यात असह्य व्हायचं ते त्याच्या सासूचं 'नाटक'. तिच्या नवऱ्याबद्दल बोलणं सुरू झालं की ती कण्हल्यासारखा आवाज काढायला सुरुवात करायची. मग हळूहळू गळा काढायची. शेवटी आक्रोश करीत जमिनीवर डोकं आपटून घ्यायची. कोणी तिला धरायला गेलं तर धडपडून सुटका करून घ्यायची नि ओरडायची, "जाऊ दे मला. डोकं फुटून मेले तर बरंच होईल. कशाला राहयलेय मी त्यांच्यामागं !"
 ती हे सगळं मुद्दामच करते असं राम ठासून म्हणायचा. ज्योती अगदी तसं म्हणायला तयार नव्हती तरी तिलाही आईचं आश्चर्य वाटत होतं. तिच्या आठवणीत तिची आई शांत, आत्मनिर्भर, कामाचा विलक्षण उरक असलेली बाई होती. ती तिखटपणे किंवा कडवटपणे बोले, पण त्रागा, आदळआपट करीत नसे. अशा तऱ्हेने तिनं आपल्या भावनांचं जाहीर प्रदर्शन केलेलं तर ज्योतीनं कधीच पाहिलं नव्हतं. नवऱ्याला अर्धांगवायूचा झटका आल्यावर मुलांना कुटुंबाचा कर्ता नाहीसा झाला असं तिनं कधी भासू दिलं नाही. त्याला खाऊ घालणं, त्याचं अंग पुसणं, त्याच्या पायांना मालिश करून पायांचे व्यायाम करून घेणं, अंगाला व्रण होऊ नयेत म्हणून दर काही तासांनी त्याची कूस बदलणं ही सगळी तासन् तास खाणारी कामं अंगावर पडूनही ती घरकामात काही उणं पडू देत नसे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप नाही तर आपला आधार गेला असं मुलांना कधी वाटलं नाही. संकटात इतकं समर्थपणे उभं राहण्याची शक्ती तिला कुठून आली ह्याचा ज्योतीला नेहमी अचंबा वाटत असे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, तिचं दुःख जरी समजण्याजोगं होतं तरी त्या दु:खाचं धरबंध सोडून केलेलं प्रदर्शन ज्योतीला चमत्कारिक वाटत होतं.
 राम म्हणाला, " कुणी भेटायला आले म्हणजे त्यांच्या समोरच फक्त त्या असं कसं करतात? याचा अर्थ त्या मुद्दामच करीत असल्या पाहिजेत."
 "पण कशासाठी?"
  " मला काय माहीत ? लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी,

७४: साथ